मोहाडी रस्त्यावरील रुग्णालयात कोविड सेंटरची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:45+5:302021-04-01T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नवे १०० बेड्सचे कोविड सेंटर सुरू केले जाणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नवे १०० बेड्सचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यानंतर त्याची क्षमता वाढवून ८०० बेडपर्यंत नेली जाणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केली.
चव्हाण यांनी सांगितले की, तेथे आयुर्वेदिक महाविद्यालयदेखील हलवले जाणार आहे. त्यानंतर या रुग्णालयात काही आरोग्य केंद्रांचे डॉक्टरही नियुक्त केले जातील. त्यासोबतच जे खासगी डॉक्टर या रुग्णालयात सेवा देण्यास इच्छुक असतील, त्या डॉक्टरांना तेथे मदतीसाठी पाठविले जाणार आहे. रुग्णालयात एका वॉर्डमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे पाणी आणि विजेची सोयदेखील करण्यात आली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
रुग्णालयातील ज्या वॉर्डात कोरोना रुग्णांना ठेवले जाणार आहे, तेथे गरजेनुसार ए.सी., फॅनदेखील लावले जात आहेत. यात रुग्णालयातील दोन विंग्ज सध्या वापरण्यास योग्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. ३०) तेथे पलंग लावणे, त्यांवर गादी, चादर, उशी अंथरणे, आदी कामे करण्यात आली आहे आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर ही कामे केली. या रुग्णालयाचे काम अद्याप सुरू असले तरी त्यातील काही भाग हा वापरण्यास योग्य आहे. त्या भागातच कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ते सुरू झाले नव्हते. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्याने सुरू असलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढीस लागल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या रुग्णालयात कोविड केअर सेंटरला सुरुवात करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे. त्यानंतर दुपारी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल यांनीदेखील या रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे तातडीने उपाययोजना करीत कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.