तयारी नवरात्रोत्साची : केडिया, घागरा, धोतीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:24 PM2019-09-21T12:24:00+5:302019-09-21T12:24:29+5:30
कपड्यांसोबत विविध प्रकारच्या ज्वेलरीला मागणी
जळगाव : अवघ्या आठवडाभरावर आलेल्या नवरात्रोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले असून बाजारपेठही त्यासाठी सज्ज झाली आहे. बाजारात आकर्षक पेहराव व ज्वेलरींनी दुकाने सजली असून यंदा केडिया, घागरा, धोतीला पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असते ती नवरात्रोत्सवाची. यंदा २९ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून मूर्ती तसेच धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या साहित्यासह खास गरबा-दांडियासाठीही लागणाºया कपडे, ज्वेलरीचीही खरेदी केली जात आहे तर कोठे बुकिंग केले जात आहे. या साठी तरुणाई तयारीला लागली आहे.
साहित्य खरेदीची धूम
नवरात्रोत्सव म्हणजे दांडिया व गरबा हे समीकरण आहे. गुजरातप्रमाणेच महाराष्टÑात गरब्याची मोठी धूम असते. गरब्यासाठी लागणारे वेगवेगळे आकर्षक कपडे, जॅकेट, डिझायनर धोतर, डिझाईन केलेल्या लेहंगा-चोली तयार करून घेतले जात आहे. विविध प्रकारचे दागिने, मल्टीरंगाचे हार बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत.
पारंपारिक पेहरावला मागणी
दरवर्षाप्रमाणे यंदाही गुजराथी, राजस्थानी पेहरावला प्रचंड मागणी आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच या पेहरावची बुकिंग करून ठेवली आहे, तर काही जणांनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात पारंपरिक ड्रेसचीही क्रेझ कमी झालेली नाही. रामलीला या चित्रपटातील घागºयाला पसंती आहे. हा घागरा दिसायला आकर्षक व वजनाला हलका आहे.
या सोबतच केडिया, जॅकेट, फेटे, पगडी, धोती, घागरा यांना मागणी अधिक आहे. या सोबतच अनेक जण खास नक्षीकाम काम व सजावट केलेले (डेकोरेटेड) ड्रेसलाही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त ज्वेलरीमध्ये गळ््यातील मोठ्या कड्यांसोबतच हात व पायातीलही कड्यांनाही मागणी असून कानातील विविध आकारातील कर्णफुले, झुमक्यांना पसंती दिली जात आहे.
यंदा भाव स्थिर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच वस्तूंचे भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जीएसटीचा काही परिणाम होणार असल्याने त्यामुळे काहीसे भाव कमी-जास्त असल्याचेही सांगण्यात येत आहे. विक्रेत्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सूटही दिली जात आहे.
प्रशिक्षण वर्ग सुरू
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दांडिया प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाच्या टिपºया आल्या आहेत.
नवरात्रोत्सवासाठी केडिया, जॅकेट, फेटे, पगडी, धोती, घागरा यांना अधिक मागणी आहे. सोबतच विविध प्रकारच्या ज्वेलरीही खरेदी केले जात आहे.
- बबिता मंधान, कपडे, ज्वेलरी विक्रेत्या.