समूह शाळांचे प्रस्ताव तयार करा; जळगावच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना!
By अमित महाबळ | Published: October 29, 2023 07:04 PM2023-10-29T19:04:17+5:302023-10-29T19:04:31+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल, सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन करता येईल.
जळगाव : शून्य ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची प्राधान्याने पडताळणी करावी, त्या ठिकाणी पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. समूह शाळा योजनेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी आणि वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल, सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन करता येईल. त्यामुळे समूह शाळा योजनेकडे कोणीही नकारात्मक दृष्टीने न पाहता आवश्यक आहे तेथे या शाळेचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केली आहे.
वार्षिक कार्य योजना अंदाजपत्रक २०२३-२४ आणि २४-२५ बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच ला. ना. शाळेच्या गंधे सभागृहात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून दुरुस्त करावयाच्या वर्ग खोल्या, मतदानासाठी असलेल्या वर्ग खोल्यांबाहेर रॅम्प व भौतिक सुविधा पूर्ण करण्याची कामे, तसेच बाला अंतर्गत मंजूर कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन केले. एकाच आवारात भरणाऱ्या मुलामुलींच्या शाळा एकत्रित करण्याच्या सूचना राज्यस्तरावरून आले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करावेत, अशी सूचना केली. गणिताचे दहा दिवस या उपक्रमामध्ये जिल्ह्यात २० टक्केपेक्षा जास्त प्रगती दिसून आली असून, भडगाव, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यांमध्ये चांगली प्रगती झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कौतुक केले.
आधारसाठी आठ दिवसांची मुदत
जिल्ह्यातील ९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झाले असले, तरी पाच टक्के विद्यार्थ्यांचे काम बाकी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मुलांची आणि आधार न काढलेल्या मुलांची यादी तयार करून येत्या आठ दिवसांत आधार व्हॅलिडेशन पूर्ण करावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी यांनी दिली.