बंडखोर नगरसेवकांचा ‘अभिमन्यू’ करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:21+5:302021-06-17T04:12:21+5:30
सेनेलाही नगरसेवक अडथळा ठरल्यास भाजप मनपात सेनेला देईल पाठिंबा : महाजनांनी घेतलेल्या बैठकीत झाली चर्चा? अजय पाटील लोकमत न्यूज ...
सेनेलाही नगरसेवक अडथळा ठरल्यास भाजप मनपात सेनेला देईल पाठिंबा : महाजनांनी घेतलेल्या बैठकीत झाली चर्चा?
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर भाजपचे भीष्म असलेल्या माजी मंत्री गिरीश महाजन यांना चकवा देत, भाजपच्या काही नगरसेवकांनी आखलेल्या चक्रव्यूहात महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे पूर्णपणे पानीपत करण्यात आले. पानीपत केलेल्या नगरसेवकांबाबत माजी मंत्र्यांचा मनात प्रचंड राग असून, त्यात बंडखोर नगरसेवक आता सेनेलाच डिवचत असल्याने येणाऱ्या काळात मनपात सेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवत बंडखोर नगरसेवकांचा अभिमन्यू करण्याची रणनीती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आखली असल्याची खात्रीलायक माहिती भाजप व सेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री गिरीश महाजन हे जळगाव शहरात आले होते. यावेळी त्यांनी शिवसनेचे ज्येष्ठ नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली. ही पूर्वनियोजित नसल्याचे सांगितले जात असले तरी या बैठकीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा असो वा त्याकडे बंडखोर नगरसेवकांनी पाठ फिरवलेल्या कारणांवर चर्चा झाली. बंडखोर नगरसेवकांचा एक गट शिवसेनेच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा झाली, तसेच या नगरसेवकांमुळे अनेक ठराव, मनपातील काही विकासात्मक कामांना मंजुरीच्यावेळेस अडचण येऊ शकते, अशी माहिती गिरीश महाजन यांना देण्यात आली.
हेव्यादाव्यात शहराचा विकास थांबायला नको
महापालिकेत भाजपने काम केले नसल्याने अडीच वर्षात फुटलेल्या नगरसेवकांच्या जोरावर स्थापन झालेल्या शिवसेनेच्या सत्तेला जळगावकरांनी एकप्रकारे समर्थन दिले आहे; मात्र अडीच वर्षात भाजपप्रमाणेच शिवसेनेतदेखील ठेक्यांचे, हेव्यादाव्यांचे राजकारण झाल्यास शिवसेनेलादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. काही ठराविक नगरसेवकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी शहराचे नुकसान व्हायला नको, या विषयावरदेखील बैठकीत चर्चा झाली.
तर..शिवसेनेला पाठिंबा देऊ,
भाजपमधून फुटून आलेल्या काही ठराविक नगरसेवकांचा गट महापालिकेत सेनेलाही अडचणीत आणत असेल तर त्या नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेत काही मुद्द्यांवर सेनेलाही पाठिंबा दिला जाईल, अशी हमी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सेना नगरसेवकांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘त्या’ नगरसेवकांबाबत अजूनही नाराजी
भाजपमधून फुटून शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मनात संबंधित नगरसेवकांबाबत तीव्र संताप आहे. त्यातल्या त्यात काही विशेष ८ ते १० नगरसेवक महाजनांसह भाजपच्या रडारवर आहेत. अशा परिस्थितीत या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपकडून नगरसेवकांना व काही पदाधिकाऱ्यांना नाशिकच्या फेऱ्या मारण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे आता महापालिकेत शिवसेनेलाही पाठिंबा देण्याची वेळ आली, तरी पाठिंबा दिला जाईल; मात्र या बंडखोर नगरसेवकांना धडा शिकविण्याची तयारी सेनेसह भाजपाने केली आहे.
बैठकीबाबत नगरसेवकांनी दिला दुजोरा
या बैठकीबाबत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकासह सेनेच्या नगरसेवकालाही विचारणा केली असता, अशा प्रकारची बैठक झाली असल्याचा दुजोरा त्यांनी दिला; मात्र याबाबत नावानिशी माहिती देण्यास नगरसेवकांनी नकार दिला आहे. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.