ए.टी.पाटील यांच्याकडील मेळाव्यात आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:27 AM2019-03-27T11:27:12+5:302019-03-27T11:29:03+5:30
ए.टी.पाटील यांच्याकडील मेळाव्यात आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती
कैलास सोनवणे, चेतन सनकत यांचा समावेश : खासदारांनी दिले होते निमंत्रण
जळगाव : भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी मंगळवारी पारोळा येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात जळगाव मनपाच्या आजी-माजी अशा १२ नगरसेवकांनी लावलेली उपस्थिती चांगलीच चर्चेची ठरली.
मेळाव्यात भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, किशोर बाविस्कर, मनोज अहूजा, किशोर चौधरी, भरत कोळी हे विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक सुनील माळी, अशोक लाडवंजारी, नितीन पाटील, भाजपाचे पदाधिकारी प्रविण कुलकर्णी, वंदना पाटील, रेखा पाटील, भगवान सोनवणे आदी उपस्थित होते. भाजपाच्या इतर कोणत्याही बड्या नेत्याने या मेळाव्याला हजेरी लावणे टाळले आहे. तसेच भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्मिता वाघ यांचे नाव देखील जाहीर झाले असताना काही नगरसेवकांनी लावलेल्या हजेरीमुळे भाजपातील गट-तट पुन्हा समोर आले आहेत. दरम्यान, कैलास सोनवणे यांच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
गिरीश महाजनांनी पाठविल्याची चर्चा
ए.टी.पाटील यांनी भाजपाच्या नगरसेवकांना या मेळाव्यात उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानंतर कैलास सोनवणेंसह इतर नगरसेवकांनी या संदर्भात गिरीश महाजन यांना मेळाव्यात उपस्थित राहण्याबाबत विचारले असता त्यांनी या परवानगी दिली असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या मेळाव्यात भाषण करताना कैलास सोनवणे यांनी ए.टी.पाटील यांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचे आवाहन केले. तसेच आपण भाजपाचे काम करा असेही कैलास सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे मेळाव्यात भाजपा नगरसेवकांना पाठवण्यामागे गिरीश महाजन असल्याचीही चर्चा आहे.