पारोळा येथे झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात ६६ शोधनिबंध सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:51 PM2017-12-12T16:51:18+5:302017-12-12T16:56:05+5:30
मराठी नाटक : आशय आणि रचना या विषयावर झाले मंथन
आॅनलाईन लोकमत
पारोळा, दि.१२ : किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने किसान महाविद्यालयात ‘१९७५ नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ६६ शोधनिबंध सादर करण्यात आले.
चर्चासत्राचे उद्घाटन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.केशव तुपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील तर व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रवीण भोळे, अलिगढ विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.ताहीर पठाण, नासिक मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम मुल्यमापन विभागाचे प्रमुख प्रा.सुरेश पाटील, जि.प.सदस्य रोहन पवार, संचालक अशोक पाटील, प्रा.प्रभा पवार, प्राचार्य डॉ.वाय.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.एच.सोनवणे, प्रा.सुभाष शेलार, प्रा.एन.बी.पाटील, प्रा.डॉ.आशुतोष पाटील, प्रा.डॉ.संजय शिंदे, प्रा.डॉ. शिरीष पाटील उपस्थित होते. या वेळी प्रा.डॉ.माणिक बागले यांच्या ‘१९७५ नंतरचे मराठी नाटक आशय आणि रचना’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चर्चासत्रात राष्ट्रीय स्तरावरून १७८ मराठी विभागाचे प्राध्यापकानी सहभाग नोंदवला. ६६ शोध निबंध सादर करण्यात आले होते. डॉ.केशव तुपे म्हणाले की, नाट्यकलेला महाराष्ट्रच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात एक प्रदीर्घ परंपरा व वेगळे स्थान आहे. मराठी माणूस हा नाट्यवेडा म्हणूनच ओळखला जातो. मराठी नाटक आशय आणि रचना या विषयावर आयोजित महाविद्यालयातील चर्चासत्र गेल्या ५० वर्षातील मराठी नाटक व रंगभूमीवर एक मौलिक चर्चा घडून आली असे त्यांनी सांगितले.
या चर्चा सत्रात गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकसह नासिक, मुंबई, पुणे, अमरावती, वर्धा, नागपूर, सोलापूर, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, बारामती, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर येथील प्राध्यापक उपस्थित होते. या चर्चासत्राच्या निमित्ताने मराठी साहित्य कादंबरी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा.एम.बी.बाविस्कर व प्रा.डॉ.प्रदीप औजेकर यांनी तर आभार प्रा.जी.एच.सोनवणे यांनी मानले.