जि. प. अध्यक्षांनी केली महिला आयोगाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:20 AM2019-02-02T11:20:17+5:302019-02-02T11:30:18+5:30
अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक
जळगाव : जिल्हा परिषदेत अधिकारी ऐकत नाही तसेच अपमानास्पद वागणूक देतात, यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत जावून महिला आयोग अध्यक्षा विजया राहटकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याबद्दल त्यांनी नुकतीच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून विविध कामांच्या फाईल या मस्कर यांच्याकडे गेल्यावरही सुमारे महिनाभरापासून त्या पेंडीग ठेवल्या तसेच प्रशासकीय मान्यताही दिली नाही, असे पत्रकारांना अध्यक्षा पाटील यांनी सांगितले होते. याचबरोबर अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही, महिला अध्यक्षा असल्याने अपमानास्पद वागणूक मिळते, सूचनांचे पालन केले जात नाही. अशा व्यथा त्यांनी मांडल्या होत्या. याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्या नुसार त्यांनी शुक्रवारी मुंबईत महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांच्याकडे आपली कैफीयत मांडली.
गिरीश महाजन यांच्या सूूचना..
. गुरुवारी गिरीश महाजन यांच्याकडे अध्यक्षा पाटील यांनी आपली तक्रार मांडली होती. यानंतर महाजन यांनी दूरध्वनीवरुन संजय मस्कर यांना जाब विचारत अध्यक्षांच्या सूचनांचे पालन करावे व कामे पेडींग ठेवू नयेत, अशा सूचना केल्या.