पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लुटले, २० ग्रॅमचे दागिने लंपास
By योगेश देऊळकार | Published: March 26, 2023 05:58 PM2023-03-26T17:58:22+5:302023-03-26T17:58:41+5:30
पिंप्री खोद्री येथील रहिवासी विनायक शामराव खोद्रे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला २३ मार्च रोजी तक्रार दिली.
जळगाव जामोद : पिंपळगाव-खांडवी रोडवर पोलिस बनून दोन भामट्यांनी २० ग्रॅम सोन्याची लुबाडणूक केल्याची घटना २६ मार्च रोजी उघडकीस आली.
पिंप्री खोद्री येथील रहिवासी विनायक शामराव खोद्रे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला २३ मार्च रोजी तक्रार दिली.
तक्रारीनुसार, त्यांचे बुलढाणा अर्बन पतसंस्था, शाखा पिंपळगाव काळे येथे बचत खाते असून त्यांनी बँकेतून सोने तारण कर्ज घेतले आहे. २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी पिंपळगाव काळे येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयात जावून पैसे भरले. बँकेमधून ४० नग गहू मण्याची पोथ, २४ नग गहू मण्याची पोथतील पदक, एक अंगठी असे एकूण वजन १३ ग्रॅमचे दागिने घेऊन ते बाहेर पडले.
१२ वाजताच्या सुमारास पिंपळगाव काळे गावाबाहेर खांडवी रोडने त्यांना अज्ञात दोघांनी आवाज दिल्याने ते थांबले. त्या दोघांनी त्यांना पोलिस असल्याचे भासवून व बतावणी करून तुमच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गांजा आहे. आम्हाला तपासणी करू द्या,असे सांगून गाडीची डिक्की उघडून दागिन्यांची थैली काढून तपासली. त्यानंतर थैली पुन्हा डिक्कीत टाकून दिली व निघून गेले. त्यानंतर त्यांनी डिक्कीतील थैली उघडून दागिने पाहिले असता त्यामध्ये दागिने सापडले नाहीत.
फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिस करीत आहेत.