धुळीमुळे शहरात सीओपीडीचा फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:04 PM2019-11-26T13:04:26+5:302019-11-26T13:04:52+5:30
जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी ...
जळगाव : रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचे साम्राज्य यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून त्यामुळे सीओपीडी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात ही संख्या दुप्पटीने वाढली आहे.
यापूर्वी घरात असलेल्या चुलीच्या धुरामुळे या आजाराचा धोका जाणवत होता. मात्र आता सर्वांकडेच गॅस सिलिंडर आल्याने घरगुती वायू प्रदुषणाचा धोका कमी झाला आहे.
मात्र तरीही हवाप्रदूषण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये या आजाराचे उशिराने निदान झाल्यामुळे फुफ्फुसाचा अॅटॅक येण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे.
जळगाव शहरात रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई नियमित केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर धुळीचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या वायूप्रदुषणाच्या अहवालातही जळगावातील हवेत धुलीकणाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. रस्ते, महामार्गाची वेळेवर साफसफाई न होणे तसेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामामुळे प्रमाण वाढले आहे.
वायूप्रदुषणाला फटाक्यांचा धूर तसेच शेतीच्याठिकाणी करण्यात येणाऱ्या धुराचाही समावेश आहे, पण ते प्रमाण नगण्य आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वायूप्रदूषण जाणवत आहे. याप्रदूषणामुळे केवळ दम्याचा आजार होण्याचे प्रमाण वाढलेले नाही तर फुफ्फुसांचा अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे.