विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खान्देशात 3 ठिकाणी ‘विद्यार्थी सुविधा’ केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 07:56 AM2017-08-15T07:56:58+5:302017-08-15T07:57:25+5:30
समाज घटकांच्या सशक्त सामाजिक व आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे ब्रीद घेतलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून खान्देशात तीन ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
चुडामण बोरसे/ जळगाव, दि.15 - समाज घटकांच्या सशक्त सामाजिक व आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे ब्रीद घेतलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून खान्देशात तीन ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत विद्यापीठाने नंदुरबार, अमळनेर आणि फैजपूर या तीनठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्रे सुरु झाली आहेत. एमकेसीएलच्या मदतीने ही केंद्रे कार्यान्वीत झाली आहेत. आता चाळीसगाव, शहादा आणि धुळे याठिकाणी ही सुविधा केंद्रे सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
विद्यार्थ्यांना अनेकवेळा गुणपत्रक, श्रेणीसुधार परीक्षा, पात्रता आदी विषयांसाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांंची गैरसोय होतेच शिवाय आर्थिक ताणही सहन करावा लागतो. ही सगळी धावपळ टळावी, यासाठी विद्यापीठाने हे विद्यार्थी हिताचे पाऊल उचलले आहे.
विद्यार्थी केंद्रात अशा असतील सुविधा
- विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठीय प्रशाळांमधील विविध अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, आवश्यक निर्धारित शुल्क ह्या बाबत माहिती मिळेल.
- विविध प्रमाणपत्रांची मागणी, प्रमाणपत्र तपासणी, प्रमाणीकरण संदर्भातील अर्ज.
- विद्यापीठाशी संबंधित सर्व प्रकारचे शुल्क आॅनलाईन अर्जासह स्वीकारण्याची सोय या सुविधा केंद्रात असेल.
- परीक्षांविषयी अर्ज .
- परीक्षा देण्यासंदर्भात संधी संपणे, संधीवाढ व त्या अनुषांगिक कामे.
- विद्यापीठ संकेतस्थळावर निकाल न दिसणे, निकालानंतर पुनर्मुल्यांकन, निकाल राखीव असणे, फोटो कॉपी, व्हेरीफिकेशन आदी सुविधा या केंद्रात उपलब्ध होणार आहेत.
ही सुविधा केंद्रे एमकेसीएलच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रात एमकेसीएलचा प्रतिनिधी पूर्णवेळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे सुविधांचे केंद्र ठरणार आहे.
नंदुरबार, अमळनेर आणि फैजपूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु झाली आहेत. आता यानंतरच्या टप्प्यात चाळीसगाव, शहादा आणि धुळे येथे ही सुविधा केंद्रे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. - पी.पी.पाटील कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव