पेट्रोल डिझेलचे दर गगनाला, तरी कुणाला काहीच कसे वाटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:24+5:302021-01-18T04:14:24+5:30
जळगाव : कोरोनामुळे आधीच उद्योग-व्यावसायावर परिणाम झाल्यामुळे, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना दिवसेंदिवस ...
जळगाव : कोरोनामुळे आधीच उद्योग-व्यावसायावर परिणाम झाल्यामुळे, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे, नागरिकांच्या खिशाला अधिकच झळ बसत आहे. या पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात विविध राजकीय पक्ष व संघटनांतर्फे आंदोलनेही करण्यात येत आहेत. असे असतांना सरकारकडुन पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमधुन सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊन पेट्रोल ९२ रुपये तर डिझेल ८० रुपये लिटरपर्यंत पोहचले आहे. या वाढत्या पेट्रोल-डिझेल दर वाढीचा सर्वाधिक परिणाम दळणवळणाच्या साधनांवर होत आहे. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, कृषी माल, उद्योजक-व्यावसायिकांचा माल आदी वाहतूक दारांनी मालाच्या वाहतूकीत भाडेवाढ केली आहे. मालवाहतूक दारांनी ही भाडेवाढ केल्यामुळे , परिणामी व्यापारी व उद्योजकानींही वस्तूंच्या किंमतीत वाढ करायला सुरूवात केली आहे. परिणामी याची सर्वाधिक झळ सर्व सामान्य नागरिकांना बसत असून, दैनंदिन जीवन जगणे या नागरिकांना अवघड होत आहे.
इन्फो :
बाहेरच्या मार्केटमध्ये कच्या तेलाचे भाव कमी असतानांही, केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढ करण्याचे काम हेतूपुर्वक सुरू आहे. यामध्ये जनतेची पिवळणूक सुरू आहे. जर पेट्रोल, डिझेल व तेलाचे भाव असेच वाढत राहिले तर, सरकार विरोधात जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस विद्यार्थी संघटना.
इन्फो :
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करुन, नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. सध्या ९२ रुपये पेट्रोल झाले असून, अजून आठ दिवसात शंभर रुपये पेट्रोल होईल. त्यामुळे मोदी सरकार नागरिकांना हेच अच्छे दिन दाखवित असून, वाढत्या महागाईचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो.
अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी.
इन्फो :
कोरोनामुळे आधीच नागरिकांना काम-धंदा नसतांना, दुसरीकडे तेलासह विविध प्रकारच्या डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्व सामान्य गरिब नागरिकांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतांना, दुसरीकडे नोकरदार वर्गाला सरकारकडून भरघोस पगारवाढ देण्यात येत आहे.
निलम शैलेंद्र सपकाळे, गृहिणी.
इन्फो :
वाढत्या महागाईची नोकरदार वर्गापेक्षा सर्व सामान्य नागरिकाना आर्थिक झळ बसत आहे. तेलाचे भाव दिवसेंदिवस वाढत असतांना, किचनचे बजेट कोलमडत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने महागाई कमी करायला हवी.
शालिनी संजय नेमाडे, गृहिणी.
इन्फो :
दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम
- पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम मालवाहतूकीच्या दरावर झाला आहे. कृषी माल, व्यापारी व उद्योजकांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी भाडेवाढ केल्यामुळे, शेतकरी व उद्योजकांना चांगलीच झळ बसत आहे. मालाची वाहतूक करणे परवडेनासे झाले आहे.
- मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे, उद्योजक व व्यावासायिकांनी हा खर्च काढण्यासाठी वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्यात येत आहे. परिणामी याचा फटका सर्व सामान्य नागरिकांनाच बसत असून, वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.