शेतमालाला भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 09:01 PM2020-01-04T21:01:16+5:302020-01-04T21:01:49+5:30
अवहेलना । कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेण्यास नकार
कासोदा, ता.एरंडोल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.
सूत्रांनुसार, खडके खुर्दचे शेतकरी विलास गुलाब पाटील हे सफेद ज्वारी घेऊन बाजार समितीत गेले. त्यांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी कोणीही व्यापारी यायला तयार होत नव्हते. संबधित शेतकºयाने विनंती करूनदेखील ते माल घेण्यासाठी तयार होत नव्हते. तेव्हा शेतकºयाने बाजार समितीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी कासोदा येथील व्यवस्थापकाला फोन केला. तेव्हा व्यापारी जयप्रकाश समदाणी आले. परंतु त्यांनी माझ्याकडे माणसं नाहीत व माल ठेवायला जागा नाही, अशी उत्तरे देऊन माल घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिलीप मंत्री यांनी सफेद ज्वारी घेण्यास नकार देऊन ज्वारी काळी असती तर घेतली असते, असे सांगून मालाची खिल्ली उडवली. काळ्या ज्वारीला मार्केट आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. पावसाचा फटका बसलेली काळी ज्वारी त्यांना कमी भावाने मिळते व नफा जास्त मिळतो म्हणून काळी ज्वारीला पसंती दिली जाते व चांगला माल नाकारला जातो, असे सर्वच मालाच्या बाबतीत घडते. अनेक तक्रारी करूनदेखील कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक यांनाही व्यापारी दाद देत नाही. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकरी बांधवांची व्यथा आहे.