चाळीसगावात कापसाला ६१५१ रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:19 PM2018-09-17T23:19:32+5:302018-09-17T23:21:01+5:30
गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर कापसाला ६१५१ रु. प्रतिविक्टंलचा भाव मिळाला आहे.
चाळीसगाव : गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर कापसाला ६१५१ रु. प्रतिविक्टंलचा भाव मिळाला आहे. तालुक्यात अद्याप कुठेच खरेदी सुरू झाली नसून ग्रामीण भागातील शेतकरी चांगला भाव मिळत असल्याने शहरात पहिल्या वेचणीचा कापूस शुभ मुहूर्तावर विक्री साठी आणत आहेत. चाळीसगाव शहरातील व्यापारी सुधाकर बाबूराव गोल्हार, व प्रशांत गोल्हार, सचिन गोल्हार यांनी शेतकºयांनी मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाची खरेदी सुरू केली आहे.
मुंदखेडा ता. चाळीसगाव येथील शेतकरी राघो महादू पाटील यांनी ६९ किलो पहिल्या वेचणीचा कापूस शुभ मुहूर्तावर मोजून दिला. तर टाकळी प्र. चा ता. चाळीसगाव येथील नरेंद्र भिवसन पवार यांनी १ क्विंटल कापूस ६१५१ रु दराने मोजून दिला. यावर्षी चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिसरात मात्र वरूण राजामुळे 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण यंदाही कमालीचे घटले आहे. बागायती कापसावरच व्यापाºयांची खरी मदार आहे. तर दुष्काळी स्थितीत कापसाचे वाढलेले भाव शेतकºयांसाठी चांगली बाब आहे.
चाळीसगाव शहरात अनेक कापसाचे व्यापारी आहेत. त्यांनी खेडा पध्दतीने कापसाची खरेदी सुरू केली आहे. दुष्काळी स्थितीत कडधान्य उत्पादनात ८० टक्के घट झाली आहे. बाजरी, ज्वारी व मकाच्या कणसात दाणे भरण्याच्या कालावधीतच पाऊस नाही.
अशा परिस्थितीत कापसाचे भाव वाढल्याने शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शासनाच्या हमी भावापेक्षा अधिक भावाने कापसाची व्यापाºयांकडून खरेदी सुरू झाली आहे.
यावर्षी कापसाला ६५०० ते ७००० पर्यंत भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे. यावेळी टाकळी प्र.चा, ओझर, मुंदखेडा, पातोंडा, खरजई तसेच चाळीसगाव भागातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.