प्लॅस्टिक बंदीचा परिणाम : खाद्य पदार्थांच्या वस्तूंचे भाव वधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:46 PM2018-06-24T23:46:14+5:302018-06-24T23:48:53+5:30
विजयकुमार सैतवाल
जळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खाद्य पदार्थांच्याही किंमतीवर होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्याने वाढण्याचे संकेत व्यापारी वर्गातून दिले जात आहे.
मार्च महिन्यात प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढल्यानंतर २३ जून पासून राज्यात बंदी लागू करण्यात आली. यामध्ये खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी, असे निर्देश आहे. त्यामुळे आता या आवरणाची जाडी वाढवावी लागणार आहे.
जळगावात सहा उद्योग
खाद्य पदार्थांचे आवरण (पॅकेजिंग मटेरिअल) तयार करणारे जळगावात सहा उद्योग आहेत. या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचेही प्लॅस्टिक तयार केले जात होते. मात्र आता बंदीमुळे या ठिकाणी केवळ ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचेच प्लॅस्टिक तयार करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच निर्मिती खर्च वाढून आता त्याची किंमतही वाढणार आहे.
बाजारात ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकमध्ये
प्लॅस्टिकवर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारपेठेचा विचार केला तर जवळपास ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकची आवरणे असलेलीच आहे. यामध्ये बेकरीतील वस्तू, फास्ट फूड, पॉपकॉर्न, चहा पावडर असे घरातील बहुतांश वस्तू प्लॅस्टिकमध्येच असते. त्यामुळे बंदी घालताना आवरणासाठी वापरात येणाºया प्लॅस्टिकचे दर कमी होणे गरजेचे आहे. अन्यथा प्लॅस्टिक निर्मितीचा खर्च वाढून त्याचा थेट बोझा ग्राहकांवरच येण्याची चिन्हे आहे.
खाद्य पदार्थ महागणार
प्लॅस्टिकची जाडी वाढल्याने त्याचा वाढीव खर्च विक्रेतेही सहन करणार नाही व ते थेट खाद्य पदार्थांच्या किंमती वाढवतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पाच-दहा रुपयांना मिळणारे पॉपकॉर्नचे पाकीटही आता सात ते १४ रुपयांना मिळेल, असा अंदाज आतापासूनच वर्तविला जात आहे. अशाच प्रकारे बेकरीतील वस्तू, चहा पावडर, फास्ट फूड व इतरही वस्तूंचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडीही आता वाढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत वाढून खाद्य पदार्थांचेही दर ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
-किरण राणे, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशन