कापसाच्या ‘बीटी’ वाणांच्या किंमती निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:51 PM2023-04-25T18:51:03+5:302023-04-25T18:51:21+5:30
खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कुंदन पाटील
जळगाव : खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान,खरीप हंगामासाठी कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे.
या सभेत सन २०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठयाबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकुण ७ लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. त्यासाठी ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.
खरीप हंगाम २०२३ साठी ७लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सार्वजनिक व खाजगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबिजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे.
दीड लाख टन खतांचा साठा
खरीप हंगाम २०२२ मध्ये २ लाख ६८ हजार ५५० मे.टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता. खरीप हंगाम २०२३ साठी ३ लाख ५ हजार १४० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या १ लाख ५७ हजार ९२ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.
या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, अमळनेरचे उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, पाचोऱ्याचे विजय पवार, जि.प.चे मोहिम अधिकारी अरूण तायडे, जिल्हा डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेद्र काबरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विक्रेते यावेळी उपस्थित होते.
पावणे सहा लाख पाकिटांची मागणी
येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली आहे. निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.