डाळीच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:49 PM2019-07-25T12:49:29+5:302019-07-25T12:50:05+5:30
गेल्या महिन्याच्या तुलनेत बाजारातील स्थिती
जळगाव : सरकारकडे असलेला डाळीचा चार लाख टन साठा विक्रीला काढण्याची घोषणा केंद्र सरकारने करताच डाळीचा बाजार अस्थिर झाला असून दररोज २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने डाळीच्या भावात चढ-उतार होत आहे. याच अस्थिरतेमुळे पाऊस नसला तरी डाळींचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला होता. मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटली होती व डाळींमध्येही तेजी आली होती. यंदाही पावसाळाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबल्याने कडधान्याची पेरणी लांबली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांनतर पावसाची ओढ अद्यापही कायम असल्याने यंदाही पिकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डाळी आतापासूनच कडाडणार असे वाटत होते. मात्र यंदा उलटेच चित्र बाजारपेठेत आहे.
सरकारच्या घोषणेने बाजार डळमळला
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला डाळीचा चार लाख टन साठा विक्रीला काढण्याची घोषणा केली आहे. हा माल बाजारात आल्यास डाळींचे भाव आणखी कमी होणार आहे. त्यामुळे व्यापारी बांधवदेखील होलसेल माल खरेदी करताना हात आखडता घेत आहे. एकीकडे डाळीचा साठा बाहेर येणार व दुसरीकडे पावसाचा परिणाम यामुळे डाळींचे भाव कमी-जास्त होत आहेत. डाळींचे भाव दररोज २०० ते ३०० रुपयांनी कमी-जास्त होत आहेत. त्यात २४ रोजी तूर डाळीचे भाव ८१०० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल होते. अशाच प्रकारे हरभरा डाळ ५५०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल, उडीद डाळ ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल व मूग डाळीचे भाव ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर होते. दोन दिवसांपूर्वी हे भाव २०० रुपयांनी जास्त होते. दररोज भावात असाच चढ-उताराचा अनुभव येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या महिन्याच्या तुलनेत भावात घसरण
पाऊस नसताना गेल्या महिन्याच्या तुलनेत डाळीचे भाव घसरले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात तूर डाळ ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल होते ते आता ८१०० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेले हरभरा डाळीचे भाव ५५०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर उडीद डाळ ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आणि मूग डाळ ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरून ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे.
शेतकºयांवर दुहेरी संकट
जून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली. कशीबशी लागवड झाली व आहे त्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाऊस झाला व पेरण्या वाढल्या. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला. त्यानंतर शनिवारी रात्री पाऊस आल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र जोरदार पावसाने शेतांमधील पिके वाहून गेल्याने दुहेरी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. त्यामुळे कोठे पावसाअभावी पिके जळत आहे तर कोठे अति पावसाने ते वाहून जात आहे. त्यामुळे सरकारने डाळीचा साठा बाहेर विक्रीला काढला तरी भाव कमी होतील मात्र कडधान्य उत्पादकांना ना भाव मिळणार व पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनही हाती येणार नसल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.
केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला डाळीचा साठा विक्रीला काढण्याची घोषणा केल्याने बाजारात अस्थिरता आली आहे. दररोज भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी-जास्त होत आहेत. त्यात पावसाने चिंता वाढविली आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.