आयातीवरील बंदीने डाळी महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:54 AM2017-08-19T04:54:26+5:302017-08-19T04:54:28+5:30
देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
विजयकुमार सैतवाल ।
जळगाव : देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ दिवसांत तुरीसह सर्वच डाळींचे भाव प्रति किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे डाळींना मागणी नसली तरी भाववाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात तब्बल दोन लाख मेट्रीक टन तूर आयात करण्यात आली. तुरीचे वाढलेले उत्पादन व आयात मालामुळे देशात साठा वाढल्याने शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ४ आॅगस्टला आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
आयातबंदीपूर्वी असलेले तुरीचे ३१०० ते ३२०० रुपये भाव आता ४००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तर तूरडाळीचे भाव ५ हजार रुपयांवरून ६,५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग यांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता असल्याने त्यांचेही भाव १० ते १५ रुपये प्रति किलोने वाढले आहेत.
>असे वाढले भाव
गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव ५० वरून ६५ रुपये प्रति किलो, मूगडाळ ५३ ते ५४ वरून ६४ रुपये, उडीदडाळ ५४ वरून ६४ रुपये, हरभराडाळ ६० वरून ७५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
आयात बंदी तसेच पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग यांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उडीद, मूग व हरभरा डाळींचेही भाव वाढले आहेत.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन, जळगाव