डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:04 PM2018-11-21T12:04:20+5:302018-11-21T12:05:07+5:30
मागणी कमी झाल्याने आठवडाभरात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून सतत भाववाढ होत असलेल्या डाळींच्या भावात या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत आवक कमी असली तरी मागणी कमी झाल्याने डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’ लागला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटसह दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात डाळींसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या उडीद, मुगाला ऐन पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने त्यांचे उत्पादन कमी होऊन कडधान्याची आवक घटली व गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत होती.
मागणी झाली कमी
बाजारात एक तर आवक कमी व मागणी जास्त असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत गेले. तीन आठवड्यात भाव वाढ होत जाऊन उडीदाची डाळ ६९०० रुपये प्रती क्विंटल पोहचली होती. तसेच हरभरा डाळ ६६०० रुपये प्रती क्विंटल, तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र सलग भाववाढीमुळे या आठवड्यात मागणी तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६६०० रुपये प्रती असलेल्या हरभरा डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६००० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहेत. मुगाची डाळ मात्र ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.
आवक नसताना भावात घसरण
तसे पाहता नवीन उडीद-मूग आल्यानंतर या दिवसात नवीन डाळींचीही आवक होते. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून मोठ्या प्रमाणात डाळी निर्यातही होतात. मात्र यंदा आवकच कमी असल्याने डाळींचे उत्पादनही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे चित्र असताना भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ््यासोबतच या दिवसातही डाळींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र भाववाढीमुळे या खरेदीच्या हंगामातच यंदा मागणी घटल्याचे चित्र आहे.
चार आठवड्यापूर्वीचे भाव
डाळींमध्ये मोठी भाववाढ होण्यापूर्वी २२ आॅक्टोबर रोजी हरभरा डाळ ५५०० रुपये प्रती क्लिंटल होती. तसेच तूर डाळ ६००० रुपये प्रती क्लिंटल, उडीद डाळ ५२०० रुपये प्रती क्लिंटल व मुगाची डाळ ७५०० रुपये प्रती क्लिंटल होती. त्यात सलग तीन आठवडे भाववाढ होत गेली. चौथ्या आठवड्यात भाववाढ थांबली असली तरी सध्याचे भाव चार आठवड्यांपूर्वीच्या भावापेक्षा जास्तच आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावात मोठी भाववाढ झाली होती. मात्र याच भाववाढीमुळे ग्राहकांनी खरेदी थांबविल्याने डाळींची मागणी कमी झाली व त्यांचे भाव घसरले आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.