भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:33 PM2018-12-28T12:33:33+5:302018-12-28T12:35:05+5:30
मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हैराण
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये केवळ वांग्यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव महिनाभराच्या तुलनेत ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढून ते १००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र कांदा, भेंडी, कारले, कोथिंबीर, टमाटे यांचे भावदेखील कमी झाले आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील विविध भागांसह शेजारील औरंगाबाद व धुळे जिल्ह्यातूनही भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी होण्यास मदत होत आहे.
कोथिंबीरच्या भावात घसरण
मध्यंतरी कोथिंबीरचे भाव वाढून ती २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेली व या आठवड्यात तर कोथिंबीरचे भाव केवळ ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे बटाट्याची आवक ३०० क्विंटलवर पोहचली असून त्याचे भाव निम्याने कमी होऊन ते ३७५ ते ६२५ रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.
मेथी भाजी १० रुपयांवर
हिवाळी वातावरणात हिरवा पालेभाजा खाण्यास मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवसात मेथी, पोकळा, शेपू-पालक, आंबडचुका यांना मागणी वाढते. त्यामुळे त्यांचे भावदेखील वाढू लागतात. मात्र यंदा या हिरव्या भाज्यांची आवकही वाढल्याने भाव नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे सध्या मेथीची भाजी केवळ १० रुपये प्रती किलोवर आली आहे. या शिवाय पोकळादेखील १० रुपये प्रती किलोवर असून पालक १८ रुपये प्रती किलोवर आला आहे.
या शिवाय लाल कांदा २५० ते ६२५ रुपये प्रती क्विंटल, पांढरा कांदा ३७५ ते ७५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. फूलकोबी ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ९०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे.
किरकोळ बाजारात दर कमी होण्याची अपेक्षा
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी आहे. किरकोळ बाजारातही हे दर कमी झाले असले तरी ज्या प्रमाणात कृउबात दर कमी झाले आहे त्या तुलनेत किरकोळ बाजारात अजून भाज्याचे दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
किरोकळ बाजारात कोथिंबीर ५० ते ६० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. मेथी भाजी ४० ते ५० रुपये, कारले ४० रुपये, पानकोबी - ३० ते ४० रुपये, फूलकोबी - ५० ते ६० रुपये, शेवगा शेंगा ४० ते ५० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, पोकळा - ३० ते ४० रुपये, कांदा - १० ते १५ रुपये, बटाटे - १५ ते २० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.
शेतकरी हैराण
हाती चांगले उत्पादन आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी समाधानी होत तर आहे, मात्र बाजारात त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे. दिवसेंदिवस भाज्यांचे दर कमी-कमी होत असल्याने भाजीपाला उत्पादक मेटाकुटीस आला आहे.