रेडक्रॉस दिनानिमित्त सेवाकार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:10+5:302021-05-09T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील एका वर्षासाठी रक्तदानाचे ब्रँड ॲम्बेसेडर, प्लेटलेट्सदानचे ब्रॅंड ॲम्बेसेडर आणि प्लाझ्मा डोनेशन ब्रँड ॲम्बेसेडरसाठी निवडीची घोषणा करण्यात आली. यासोबतच कोरोनाकाळात इंडियन रेड क्रॉस सोसायटी करीत असलेल्या सेवाकार्याचादेखील गौरव केला.
कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये रेडक्रॉस सोसायटीने कम्युनिटी किचन, आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, घरपोहोच औषध पुरविणे अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सेवाकार्य केले. तसेच दुसऱ्या लाटेतही लसीकरण केंद्र, ॲन्टिजन तपासणी केंद्र चालवून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे. प्लाझ्मादान मोहिमेतही जिल्ह्यात रेडक्रॉस काम करत आहे. अखंडित सेवेचा हा यज्ञ सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने असाच चालत राहो, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
यंदाचे ब्रँड ॲम्बेसेडर घोषित
रक्तदानाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अतुल अनंत मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांनी १७५ वेळा रक्तदान केले आहे. प्लेटलेट्सदानचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून अयाज मोहसीन यांची निवड करण्यात आली. आत्तापर्यंत त्यांनी ४० पेक्षा जास्त वेळा प्लेटलेट्सदान केले आहे. प्लाझ्मा डोनेशन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून शगुन पवन मंडोरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
उत्कृष्ट कर्मचारी सेवा पुरस्कार
सरला दाते उत्कृष्ट कर्मचारी सेवा पुरस्कार रेडक्रॉसचे सीनिअर प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गोपाळ कोळी, प्रयोगशाळा आहाय्यक किरण देवराम बाविस्कर यांना जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानद सचिव विनोद बियाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, उज्ज्वला वर्मा आदी उपस्थित होते.