चाळीसगाव तालुक्यातील प्रिंपी खुर्द गाव कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:40+5:302021-06-09T04:20:40+5:30

चाळीसगाव : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना या तालुक्यातील पिंप्री खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. शासनाच्या ...

Primpi Khurd village in Chalisgaon taluka is free from corona | चाळीसगाव तालुक्यातील प्रिंपी खुर्द गाव कोरोनामुक्त

चाळीसगाव तालुक्यातील प्रिंपी खुर्द गाव कोरोनामुक्त

Next

चाळीसगाव : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना या तालुक्यातील पिंप्री खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. शासनाच्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी, व्यापक जनजागृती, सामूहिक इच्छाशक्तीला मिळालेली प्रयत्नांची जोड यामुळे या गावाला कोरोनामुक्त करण्यात यश मिळाले आहे.

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर असलेले पिंप्री खुर्द हे ३५०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती असल्याने व्यवसायाशी निगडित व्यापारी, मजूर, दुकानदारांच्या माध्यमातून गावात लोकांची रेलचेल असूनही गावातील सर्वांच्या एकत्रित सहभागामुळे कोरोनाचा शिरकाव गावात होऊ शकला नाही. फेब्रुवारी महिन्यात गावातील तीन रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यानंतर गावात कोरोनाला ‘एंट्री’ द्यायची नाही, असा संकल्प सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच तकतसिंग नामदेव पवार, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावकऱ्यांनी केला आणि त्यासाठी काही अंमलबजावणी केली. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला नाही.

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ‘माझं गाव माझी जबाबदारी’अंतर्गत उपक्रम राबविण्यात आला. गावात सर्व भागात फवारणी, साफसफाई, स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. याचबरोबर कोरोना होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची कशी काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे जनजागृती करण्यात आली. गावात ७५ टक्के लोकांनी लस घेतली आहे.

मास्क नियमित वापरणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदींबाबत खबरदारी घेण्यात आली. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी गावात भेट देऊन मार्गदर्शन केले.

यासाठी सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच तकतसिंग पवार, ग्रामसेवक विकास सोनवणे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. मोनिका चव्हाण, आरोग्य सहायक व्ही. पी. पाटील, आरोग्य सेवक सुनील कोष्टी, सपना जवराज, इंदल राठोड, संजय राठोड, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.

गावकऱ्यांनी दिलेली साथ, काटेकोरपणे नियमांचे पालन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याने तसेच गटविकास नंदकुमार वाळेकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाली.

- तकतसिंग नामदेव पवार, उपसरपंच पिंप्री खुर्द, तालुका चाळीसगाव

Web Title: Primpi Khurd village in Chalisgaon taluka is free from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.