जळगावच्या प्रिन्सला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार; घरात शिरलेल्या चोरट्याशी दिली होती झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 01:09 PM2021-02-17T13:09:20+5:302021-02-17T13:09:35+5:30
पुढील महिन्यात पुरस्काराचे वितरण होणार
- संजय पाटील
जळगाव: प्रिन्स नितीन पाटील (रा. अमळनेर, ह. मु. चोपडा) या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल कार्यालयातून पाटील कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील हा पंकज ग्लोबल शाळेचा विद्यार्थी असून घरात शिरलेल्या चोरट्याशी झुंज दिल्याबद्दल त्याला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्य बाल आयोग कार्यालयातून ही माहिती देण्यात आल्याचे पालक नितीन पाटील यांनी सांगितले. पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गेल्या वर्षी नितीन रामभाऊ पाटील यांच्या चोपडा येथील ओम साई अपार्टमेंटमध्ये ते घरी नसताना दुपारी ३ च्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एक पुरुषाने लूटमार करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. मिरचीचा स्प्रे प्रणितची आई वैशाली हिच्या तोंडावर मारला. वैशाली पाटील यांनी चोराची कॉलर पकडून विरोध करत असताना चोरट्याने त्यांना मारहाण करत ढकलून दिले.
अवघ्या १२ वर्षाच्या प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे त्याला पळता येत नव्हते. बराच वेळ प्रणितने ताकद लावून त्याला घट्ट धरून ठेवले. त्या दरम्यान घरातील काम करणाऱ्या लताबाईने गॅलरीत जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. आजूबाजूच्या लोकांनी खाली गर्दी केली. त्याचवेळी चोर प्रणितच्या तावडीतून पळाला. तोपर्यंत खाली जमलेल्या गर्दीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वैशाली पाटील यांचे प्राण वाचले आणि दरोडा पडण्यापासून बचावला.
प्रणितच्या या धाडसाचे कौतुक झाले आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मंगळवारी राज्य बाल आयोग कार्यालयातून अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फोनवरून प्रणित उर्फ प्रिन्सला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. प्रणितचे वडील नितीन रामभाऊ पाटील हे अभियंता व संस्थाचालक आहेत. आई वैशाली गॅस एजन्सीचा कारभार पाहतात.