पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी प्राचार्य प्रभाकर चौधरी यांच्या पुस्तकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:43 PM2018-07-18T16:43:56+5:302018-07-18T16:44:39+5:30
१५ पुस्तके मुलांसाठी ठरणार प्रेरणादायी
जळगाव : येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी यांच्या १५ पुस्तकांची इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी शासनातर्फे निवड करण्यात आली आहे.
महाराष्टÑ शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभाग परिषदेतर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या बालमित्रांसाठी होती. प्रकाशकांनी त्यांच्यासाठी पुरवणी वाचनाकरिता पुस्तके तयार करावयाची होती. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत ही योजना होती. ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’ असे घोषवाक्य या अभियानाचे आहे. या अनुषंगाने सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी यांनी सद्गुणांवर आधारित गोष्टी लिहिल्या. त्यात धाडस, संयम, मैत्री, माणुसकी, श्रद्धा, आत्मसन्मान, आत्मविश्वास, खंबीरपणा, प्रामाणिकपणा आदी पुस्तकांचा समावेश आहे.
६० गोष्टींची १५ पुस्तके अथर्व पब्लिकेशन्सच्या युवराज माळी यांनी रंगीत छपाईत प्रसिद्ध केली आहेत. महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या स्पर्धेत ती सर्वच्या सर्व निवडली गेली. प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी हे नामवंत शिक्षणतज्ज्ञ असून, ते शालेय मुला-मुलींसाठी सतत संस्कारक्षम लेखन करीत असतात. सुबोध व रंजक स्वरुपाच्या या प्रत्येक गोष्टीतून सद्गुण जाणवतात, हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.