मुदत संपूनही प्राचार्य पदावर ठेवले कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:54+5:302020-12-11T04:42:54+5:30
जळगाव : भुसावळ येथील पी.के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांना पाच वर्ष पूर्ण होऊनदेखील अद्यापही त्या प्राचार्यपदावर ...
जळगाव : भुसावळ येथील पी.के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांना पाच वर्ष पूर्ण होऊनदेखील अद्यापही त्या प्राचार्यपदावर कायम असल्याचा प्रकार एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी टाकलेल्या माहिती अधिकारातून समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार गुन्हा दाखल करण्यात असून, लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि. ३० जून २०१०च्या अधिसूचनेनुसार प्राचार्य पदावर साबद्रा यांची नियुक्ती झाली होती. नंतर महाराष्ट्र शासनाच्या १५ फेब्रुवारी २०११च्या शासन निर्णय व उमविचे २५ एप्रिल २०११च्या परिपत्रकानुसार डॉ. मंगला साबद्रा यांना ८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्राचार्य पदाचे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत. मात्र, पाच वर्ष पूर्ण होऊनसुद्धा त्या प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, विद्यापीठाने यासाठी लाखो रुपयांची लाच घेऊन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याप्रमाणे प्राचार्य पदाची मुदत संपली असूनही साबद्रा यांनी कायम पद ठेवले असल्याचा आरोप देवेंद्र मराठे यांनी केला आहे. तर डॉ. मंगला साबद्रा यांनी मुलाखत घेतेवेळी स्वत:चा शैक्षणिक कामगिरी निर्देशांक, की जो मुलाखत घेतेवेळी उमेदवाराने सोबत ठेवावा लागतो तोदेखील उपलब्ध नव्हता, असेही त्या माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाले असल्यामुळे गुन्हा दाखल करणार असल्याचे देवेंद्र मराठे यांनी सांगितले.