जळगावात ‘डब्बा ट्रेड’ मार्केटींग सेंटरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:13 PM2019-07-10T12:13:15+5:302019-07-10T12:13:59+5:30

जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

Print to 'Dabba Trade' Marketing Center at Jalgaon | जळगावात ‘डब्बा ट्रेड’ मार्केटींग सेंटरवर छापा

जळगावात ‘डब्बा ट्रेड’ मार्केटींग सेंटरवर छापा

googlenewsNext

जळगाव : शेअर मार्केटींगमधील ‘डब्बा ट्रेड’ नावाचा अवैध मार्केटींग व्यवसाय करणाऱ्या शहरातील जयकिसनवाडी व गणेश कॉलनी येथील सेंटरवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता छापा मारला. त्यात मुख्य संशयित चेतन छाजेड याच्यासह तीन जणांना तर गणेश कॉलनीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जयकिसनवाडीतील एका दुमजली इमारतीतीत शेअर मार्केटमधील ‘डब्बा ट्रेड’ नावाचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार रोहन यांनी त्यांच्या कार्यालयातील उपनिरीक्षक मनोहर जाधव, सुनील पाटील, किरण धमके, राजेश चौधरी, अशोक फुसे, नाना मोरे, सचिन साळुंखे व महेश पवार यांच्यासह मंगळवारी सायंकाळी इमारतीतील कार्यालयावर छापा टाकला.
तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर डॉ. रोहन यांनी चेतन छाजेड याच्यासह दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील संगणक, मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
जयकिसनवाडीतील घटनेप्रकरणी शहर पोलिसात तर गणेश कॉलनीतील घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या व्यवसायाबाबत दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ होते, हे विशेष !
मोबाईलद्वारे चालतो व्यवहार
‘डब्बा ट्रेड’ हा व्यवसाय सट्टा व हवालाच्या व्यवसायाशी मिळता जुळता आहे. मोबाईलवर ग्राहकांकडून पैशाची बोली लावली जाते. आॅनलाईन मार्केटनुसार पैसा मिळतो. फक्त काळा पैसाच यात खेळला जातो. केवायसीद्वारे लॉग इन करुन बॅँकेच्या माध्यमातून पैसा वळता केला जातो. हा पैसा अधिकृत मानला जातो. डब्बा ट्रेडमध्ये मोबाईलवरच संपर्क करुन पैशाचा व्यवहार केला जातो. छाजेड याच्या कार्यालयातून पुणे व मुंबई येथे पैसा लावला जात असल्याचे उघड झाले. डब्बा ट्रेड हा व्यवसाय अवैधरित्याच चालत असल्याची माहिती डॉ.नीलाभ रोहन यांनी दिली.
कार्यालय ब्रोकरचे, काम डब्बा ट्रेडचे...
चेतन छाजेड याची ओळख ब्रोकर म्हणून आहे. त्याच्या कार्यालयात खरेदी-विक्रीसंबंधीच कामकाज चालत असल्याचा समज होता. मात्र या कार्यालयात ब्रोकरच्या नावाखाली डब्बा ट्रेड नावाची अवैध व्यवसाय चालत असल्याचे प्रथमच उघड झाले. कार्यालय आलिशान असल्याने कोणालाही संशय येत नाही. दरम्यान, गेल्या वर्षी छाजेड याच्यावर याच कार्यालयात हल्ला झाला होता. कार्यालयाचीही तोडफोड झाली होती. त्यामागे हेच कारण असावे अशी चर्चा घटनास्थळावर होती.

Web Title: Print to 'Dabba Trade' Marketing Center at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव