चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट दारूच्या कारखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:26 PM2019-03-18T18:26:57+5:302019-03-18T18:30:26+5:30
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. सोमवारी पहाटे दीड वाजता ही कारवाई करण्यात आली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, अवैद्य धंद्यांनी डोके वर काढल्याने शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर उमटला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाई झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
करजगाव येथे मराठी शाळेच्या मागे मनोज शरद साबळे (वय ३५) याच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता डीवायएसपी नजीर शेख यांच्यासह राजेश दावणे, अमोल कुमावत, गोवर्धन बोरसे, हिरामण तायडे, महेंद्र साळुंखे यांच्या पथकाने येथे छापा घातला. यावेळी येथे मनोज साबळे व विनोद जिभाऊ पवार (वय ३०) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मनोज राजपूत, मनोज मांडगे (दोन्ही रा.चाळीसगाव) हे मात्र येथून पसार झाले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत मद्याच्या बाटल्या, दारु बनविण्यासाठीचे अल्कोहोल, बुच लावण्याचे मशीन असा एकूण दोन लाख सहा हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
प्राप्त माहितीनुसार, मनोज साबळे याने जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्याचे इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत असणारे छायाचित्रे दिवसभर सोशल मिडियावर व्हायरल होत होते. गेल्या काही दिवसात गांजा तस्करी, वाळू माफियांची मुजोरी याबरोबरच अवैद्य शस्त्रांचाही वापर होत असल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आपला खाक्या दाखवावा, अशी अपेक्षाही होत आहे.
सोमवारी दोघा आरोपींना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास फौजदार जगदीश मुलगीर करीत आहे.