शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योगास प्राधान्य : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:14 PM2017-10-18T19:14:11+5:302017-10-18T19:21:26+5:30
जळगावात शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ. जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांचा सन्मान
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१८ : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी शासन कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करायला प्राधान्य देत आहे. या उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालावर त्याचठिकाणी प्रक्रिया झाल्यास त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार असून त्यांच्या मालाला भाव मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातही केळी, कापूस या पिकांना मोठा फायदा होऊन योग्य भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ योजनेंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० शेतकरी दाम्पत्यांचा गिरीष महाजन यांच्याहस्ते कर्जमुक्ती प्रमाणपत्र, साडी, चोळी व पोशाख देवून जिल्हा नियोजन सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, किशोर पाटील, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.
शेतीला शाश्वत वीज व पाणी उपलब्ध करुन देणार
महाजन पुढे म्हणाले की, येत्या पाच वर्षात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी राज्यात शेतीला शाश्वत वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढण्यासाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफीचा लाभ मिळणारच
या पूर्वी राज्यात केवळ पाच ते सहा हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली, मात्र आता राज्यातील शेतकऱ्याना दिलेली कर्जमाफी ही ऐतिहासिक असून यामध्ये ३० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर या कर्जमाफी योजनेपासून राज्यातील कुणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यासाठी काही कालावधी लागला असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफीचा लाभ मिळणारच असे सांगून ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने शासनाची दिवाळी भेट असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिंबधकांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आणि जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांचा महाजन व पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील 30 शेतकऱ्यां कर्जमुक्ती प्रमाणपत्र, साडी, चोळी व पोशाख देऊन सन्मान करण्यात आला.