खिडकीची जाळी तोडून बलात्काराच्या गुन्ह्यातील बंद्याचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:43+5:302021-06-27T04:12:43+5:30
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंकर रवींद्र चव्हाण उर्फ रहिम मज्जू पठाण (वय २०, ...
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंकर रवींद्र चव्हाण उर्फ रहिम मज्जू पठाण (वय २०, रा. शिव कॉलनी, चाळीसगाव) याने पोलिसांची नजर चुकवून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीची जाळी तोडून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे झाली. या रुग्णालयातून न्यायालयीन बंदी पलायन केल्याची दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून शंकर रवींद्र चव्हाण उर्फ रहिम मज्जू पठाण याच्याविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. २२ जून रोजी त्याने प्रकृती खराब असल्याचे कारण सांगितल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौथ्या मजल्यावरील बंदी कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलीस मुख्यालयाचे हवालदार सुरेश श्रीराम सपकाळे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला होते. शनिवारी पहाटे दोन ते ४.४५ च्या दरम्यान पोलिसांची नजर चुकवून त्याने खिडकीची तारेची जाळी तोडून पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. शेवटी सुरेश सपकाळे यांनी नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
आधीचा बंदी सापडला होता शेतात
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी याच वाॅर्डातून संशयित पसार झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली होती. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो परिसरातील शेतात लपलेला मिळून आला होता. आता पुन्हा पोलिसांच्या रखवालीतून बंद्याने पलायन केल्याची घटना घडल्याने सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.