लोकसभेत हसू अनावर व्हायचं वेगळंच कारण; व्हायरल व्हिडीओवर रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 11:33 AM2019-07-20T11:33:43+5:302019-07-20T11:39:08+5:30
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली', हे वाक्य ऐकून भाजपाच्या खासदारांना हसू आवरलं नाही, अशी टिप्पणी विरोधक करत आहेत.
भाजपा नेत्या आणि दिंडोरी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवोदित खासदार असूनही त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, ते कौतुकास्पद आहेच; पण हे भाषण व्हायरल होण्यामागचं कारण वेगळं आहे. ते म्हणजे, भारती पवार बोलत असताना त्यांच्या मागच्या बाकांवर बसलेल्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि डॉ. रक्षा खडसे यांचं हसू. लोकसभेत गंभीर विषयांवर चर्चा सुरू असताना, त्यातही महाराष्ट्रातीलच एक खासदार बोलत असताना या दोघींचं हसणं नेटकऱ्यांना खटकलंय आणि त्यामुळेच त्यांच्यावर टीकाही होतेय. त्यावर, रक्षा खडसे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभेत आमच्या हसण्याचा डॉ. भारती पवार यांच्या भाषणाशी संबंध नव्हता. उलट, त्यांना समर्थन देण्यासाठी त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत आम्ही सभागृहात उपस्थित होतो. कर्जमाफीचा विषय आला म्हणून आम्ही हसलो, असा विषय दुरान्वयेही नाही. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह सर्वांसाठी जो विकास झाला त्याचा अभिमान आहे. सूज्ञ लोक याचा गैरअर्थ काढणार नाहीत ही अपेक्षा, असं निवेदन रक्षा खडसे यांनी केलं आहे. माध्यमांनी चांगल्या कामांना प्रसिद्धी द्यावी, हसण्याचा विषय इतरा गंभीरपणे घ्यायची गरज नाही, संसदेत हास्य-विनोद होतच असतात, असंही त्यांनी नमूद केलंय.
परंतु, विरोधक या विषयावरून भाजपाला लक्ष्य करत आहेत. 'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली', हे वाक्य ऐकून भाजपाच्या खासदारांना हसू आवरलं नाही, अशी टिप्पणी करत काही फेसबुक पेजवरून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू इतकं अनावर झालं की त्यांनी बेंचखाली डोकं घातलं, असं या व्हिडीओत दिसतंय.
Video : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली म्हणताच, प्रितम मुंडे अन् रक्षा खडसेंना हसू https://t.co/pq5WK49RmR
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2019