"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 07:18 PM2024-07-07T19:18:12+5:302024-07-07T19:18:23+5:30
प्रशांत भदाणे, जळगाव - "मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे ...
प्रशांत भदाणे,जळगाव- "मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद असतो. ती सरकारची कामाची एक दिशा, स्ट्रॅटेजी आणि ब्लू प्रिंट असते", असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी रविवारी दुपारी जळगावात केलं.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरोदा येथे आयोजित माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्य सत्कारार्थी म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारमध्ये श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याच विषयाला चव्हाणांनी आज पुन्हा हात घालत राष्ट्रवादीला डिवचल्याचं बोललं जातंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या काळात त्यांनी सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारासंदर्भात, तसेच या क्षेत्रात काय भरीव कामगिरी करता येईल, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आग्रही मागणी केली होती. त्याच मुद्द्यावरून त्याकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचा इतिहास आहे. याच विषयाला अनुसरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावात हे वक्तव्य केलं. माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलं. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी काढलेली श्वेतपत्रिका राज्याला मार्गदर्शक ठरली. हाच दाखला देत त्यांनी श्वेतपत्रिकेच्या मुद्द्याला हात घातला.
तर आज पक्षही फुटले नसते...
आजच्या या पाच वर्षांच्या घडामोडींमध्ये जर बाळासाहेब चौधरींसारखा सभापती असता, तर हे राजकारण घडलंच नसतं. पक्षही फुटले नसते, राज्याला न्याय मिळाला असता. पण नाही मिळाला. हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला न्याय दिला. विधानसभेच्या निवडणुकीत पण जनता आम्हाला न्याय देईल, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.