लसीकरणाच्या पहिल्या दिवशी खासगीतही हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:16+5:302021-03-05T04:16:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य व्याधी असलेल्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला खासगी रुग्णालयांमध्ये फी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य व्याधी असलेल्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला खासगी रुग्णालयांमध्ये फी आकारून सुरुवात करण्यात आली. मात्र, शहरातील दोन ते तीन केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे तसेच अनेक ठिकाणी त्यांची हेळसांड झाल्याचे चित्र होते. एका केंद्रावर तर लंच टाईम झाल्याचे सांगत एका वृद्ध दाम्पत्याला केंद्राच्या बाहेर काढून दरवाजा बंद करण्यात आला होता.
शहरात कोरोना लसीकरणासाठी पैसे घेऊन लस देण्यासाठी ८ केंद्र निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी काही ठिकाणी सकाळी साडेनऊ तर काही ठिकाणी ११ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
असे होते वास्तव
अभिनव शाळेजवळील साईलीला हॉस्पिटलमध्ये अगदी बोळात लसीकरण केंद्र आहे. यात खाली काही पायऱ्या उतरून जावे लागते. जागा कमी असून दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता, उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आत जायच्या आधीच सुरक्षा रक्षकाने आता तीन वाजता या असे सांगितले. दरम्यान, लंच टाईम झाल्याचे सांगत एका वृद्ध दांपत्याला जायला सांगून गेट बंद करून घेण्यात आले होते.
शाहू महाराज रुग्णालयात १३९ जणांची नोंदणी झालेली होती. ४१ जणांनी लस घेतली होती. या ठिकाणी नियोजन सुरळीत होते. डॉ. तेजस राणे स्वत: थांबून होते. नोंदणीची प्रक्रिया, प्रतिक्षालय, निरीक्षक कक्ष असे नियोजन होते.
ऑर्किड हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. शिवाय एक व्यक्ती अनेक आधार कार्ड दाखवून प्रमाणपत्र प्रमाणित करीत असल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण झाल्याचे एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. सकाळी दहा वाजेपासून आलोय मात्र, अद्याप लस दिली गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाजन हॉस्पिटलमध्ये दुपारी १ पर्यंत दोनच लाभार्थींनी लस घेतली होती. मात्र, नियोजन सुस्थितीत असल्याचे चित्र होते. आयसीयूमध्ये यासाठी स्वतंत्र तीन कक्ष व स्वतंत्र यंत्रणा असल्याचे डॉ. रेखा महाजन यांनी सांगितले.