खासगीतही बेड फूल, शासकीय बेड वाढविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:54+5:302021-03-22T04:14:54+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शहरात बांधितांचे प्रमाणे चाळीस टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असताना ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शहरात बांधितांचे प्रमाणे चाळीस टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कमी येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यात शहरात ३ हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असल्याने बेड मॅनेजमेंटचा मुद्दा अत्यंत कळीचा बनला आहे. खासगीतही सहजा सहजी बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत आता शासकीय यंत्रणेत बेड वाढविण्यावर प्रशासनाने भर दिल्याचे चित्र असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्णत: कोविड घोषित केेले आहे. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कक्ष उघडून बेड वाढविण्यात येत आहेत. शहरात अनेक नवीन रुग्णालयांना कोविडची मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खासगीतही बेड फुल असल्याचे सांगत अनेक वेळा रुग्णांना थेट परत पाठविले जाते. अनेक वेळा व्हेंटिलेटरचा मुद्दा समोर केला जातो. अशा स्थितीत रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. सद्य:स्थितीत शहरात इकरा महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू आहे. यात ही बेड वाढविण्यात येत आहेत. रुग्णालयातून रुग्ण डिस्चार्ज होताच अन्य रुग्ण वेटिंगवरील तातडीने दाखल होत असल्याचे चित्र आहे.
अशी आहे बेडची स्थिती
कोरोना रुग्णांसाठी असलेले बेड डीसीएच आणि डीसीएचसी
एकूण : १११९
रिकामे बेड : २८५
शासकीय रुग्णालय
एकूण : २३०
रिकामे : ००
खासगी रुग्णालय
एकूण ९६९
रिकामे : २८५
सीसीसीही ८० टक्के फुल
शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये १ हजारापेक्षा अधिक बेडची व्यवस्था असताना या ठिकाणी ९०० रुग्ण दाखल आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात येत असते. हे बेडही वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यात आयटीआयची इमारतही ताब्यात घेऊन लवकरच या ठिकाणी २३३ बेडचे नियोजन करण्यात येणार आहे. सोमवार किंवा मंगळवारपासून ही इमारत सेवेत असेल.
त्रीसूत्रीनुसारच उपचार होण्याचे आदेश
काही खासगी रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणांच्या रुग्णांनाही दाखल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी लक्षणानुसारच रुग्णांना दाखल करावे, यात गंभीर रुग्णांना डीसीएच तर ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना डीसीएचसीमध्येच दाखल करावे, असे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देणयात आला होता. शहरात इकरा महाविद्यालयात ७६ बेड आहेत. मात्र, ते पूर्णत: फुल असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे कोविड रुग्णालयात हळूहळू सर्व कक्ष उघडण्यात येत आहेत.