सोमवारपासून खासगी प्रवासी वाहतूक कार्यालये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:24+5:302021-04-10T04:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ५ एप्रिलच्या आदेशानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ५ एप्रिलच्या आदेशानुसार जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहेत. या निर्बंधातून ऑप्टीकल दुकाने, अभ्यासिका, खासगी प्रवासी वाहतूक कार्यालये, चार्टड अकाउंटन्ट कार्यालये सुरू ठेवण्याच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी निर्गमित केले आहे. या सर्व सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे सोमवारपासून कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑप्टीकल दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येतील. जळगाव शहर मनपा क्षेत्रात शासकीय व खासगी रुग्णालयास चादरी, बेडशिट व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व शहर मनपा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात संबंधित तहसीलदारांमार्फत आवश्यकतेनुसार ठराविक वेळेकरिता दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. तथापि, अशी दुकाने सुरू करताना संबंधित दुकानचालकांना संबंधित रुग्णालयाकडून पुरवठा करण्याबाबतची लेखी मागणी सादर करावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे. अशा दुकानदारांना परवानगी घेतल्यानंतर मागणी केलेले साहित्य काढून दिल्यानंतर लगेच दुकान बंद करावे लागेल.
अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ ५० क्षमतेच्या मर्यादेत फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येतील. खासगी प्रवासी वाहतूक कार्यालये हे फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येतील. इतर खासगी कार्यालयांमध्ये फायनान्शिअल मार्केट, पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स, ऑल नॉन बँकींग फायनान्शिअल कार्पोरेशन्स यांना सूट देण्याबाबत नमूद केले आहे.
या सर्व ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास १० एप्रिलपासून चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहणार आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.