तीन वर्षांपासून जळगाव आगारातील पार्किंगचा प्रश्न सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:22+5:302021-06-29T04:12:22+5:30
जळगाव : जळगाव आगारातील दुचाकी पार्किंगचा प्रश्न अद्यापही सुटला नसून, दिवसेंदिवस येथील पार्किंगची समस्या बिकट बनत आहे. आगारात दुचाकी ...
जळगाव : जळगाव आगारातील दुचाकी पार्किंगचा प्रश्न अद्यापही सुटला नसून, दिवसेंदिवस येथील पार्किंगची समस्या बिकट बनत आहे. आगारात दुचाकी ना चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा कुठेही नसल्याने, वाहनधारक थेट बस स्थानकात वाहने पार्किंग करत आहेत. काही बेशिस्त वाहनधारक तर थेट चारचाकी वाहने आतमध्ये पार्किंग करत असतांनाही, आगारातील सुरक्षारक्षक या वाहनधारकांवर कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे वाहनधारकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. या पूर्वीच्या ठेकेदाराने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तीन वर्षांपूर्वी जळगाव आगार प्रशासनाने या मक्तेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यानंतर नवीन मक्तेदाराला पार्किंगचा ठेका देण्यासाठी जळगाव आगार प्रशासनातर्फे आतापर्यंत दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र, कुठल्याही मक्तेदारातर्फे या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून आगारातील पार्किंगचा प्रश्न रखडलेलाच आहे. तीन वर्षांपासून आगारात पार्किंगची सुविधा नसल्याने, नातलगांना सोडण्यासाठी येणारे वाहनधारक थेट बस स्थानकातच मिळेल त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग करत आहेत. आगाराच्या मुख्य गेट जवळच दररोज १०० ते १२५ दुचाकी पार्किंग होत असल्याने, दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. वाहन चालकांना काही वेळा बस काढण्यासाठी जागा राहत नसल्यामुळे, अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो :
सुरक्षारक्षकांकडून फक्त बघ्यांची भूमिका
आगारात महामंडळ कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त इतर वाहनधारकांना दुचाकी पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आगारात दुचाकी न शिरवता आपल्या नातलग प्रवाशांना आगाराच्या गेटवरच उतरविण्याची परवानगी आहे. मात्र,असे असताना वाहनधारक थेट आगारात दुचाकी पार्किंग करून प्रवाशांना सोडत आहेत. तर चारचाकी वाहनधारक थेट बसपर्यंत वाहन नेऊन नातलगांना सोडत आहेत. या प्रकारामुळे बसचालकांना आगारातून बस बाहेर काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, यामुळे बस स्थानकातच अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्व प्रकार दररोज आगारातील महामंडळाच्याच सुरक्षा रक्षकांसमोर सुरू असतो. असे असतांना या सुरक्षारक्षकांकडून कुठलीही कारवाई या वाहनधारकांना केली जात नाही. काही महिन्यांपूर्वी एका बसचा आगारात पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकीला धक्का लागल्याने, संबंधित वाहक व दुचाकीस्वारांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाले होते. तरी देखील सुरक्षारक्षकांकडून या वाहनधारकांवर कुठलीही कारवाई केली जात नसल्यामुळे,या सुरक्षा रक्षकांवरच आगार व्यवस्थापकांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
इन्फो :
आगारात पार्किंगची सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी आगाराच्या बांधकाम विभागातर्फे दोनवेळा निविदा काढण्यात आल्या असून, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद मिळाल्यावरच पुढील प्रकिया करण्यात येईल. तसेच आगारात होणाऱ्या बेशिस्त पार्किंगबाबत कारवाई करण्यासाठी सुरक्षारक्षकांना वेळोवेळी सूचना करण्यात येत आहेत.
-प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार