रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:38+5:302021-03-19T04:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सर्व नागरिक शहरातील रस्त्यांच्या समस्येमुळे त्रासले आहेत. त्यामुळे प्राधान्याने शासनाकडून शंभर कोटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सर्व नागरिक शहरातील रस्त्यांच्या समस्येमुळे त्रासले आहेत. त्यामुळे प्राधान्याने शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी आणून रस्त्यांचा प्रश्न सोडवून खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस जळगाव महापालिकेच्या नूतन महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन या १५ मतांनी निवडून आल्या आहेत. दरम्यान, निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयश्री महाजन यांनी सुरुवातीला सर्वांचे आभार मानले. गेल्या अडीच वर्षांपासून भाजपकडे सत्ता असूनही त्यांनी विकासाचे एकही काम न केल्याने भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यांच्या मदतीमुळे शिवसेनेचा महापौर झाला आहे. महापौर झाल्यानतंर सर्वात प्रथम जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावणार
महापालिका मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही व गाळेधारकांवरही अन्याय होणार नाही, या दृष्टीकोनातून मार्ग काढण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले.
सुरेश जैन यांचे स्वप्न पूर्ण करणार
शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेश जैन यांनी पाहिलेले सुंदर शहर जळगाव शहराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विरोधकांना सोबत घेवून विकासाचे काम करणार असल्याचेही जयश्री महाजन यांनी सांगीतले. यासह नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास पालकर, संजय सावंत यांचे ही जयश्री महाजन यांनी आभार मानले.