जळगाव शहराच्या गरजा पाहून चौपदरीकरण होत नसल्याने उद्भवणार समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:48 PM2020-03-20T12:48:10+5:302020-03-20T12:48:44+5:30
रेल्वे पूल व गिरणा पुलावर रुंदीकरणही आवश्यक
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत अनेक समस्या असून या चौपदरीकरणांतर्गत कोठे पूल अथवा कोठे भुयारी मार्ग असावे हे उपग्रहांच्या सहाय्याने ठरविल्याने अनेक अडचणी उद््भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात शहराच्या गरजेनुसार कोठे काय आवश्यक आहे, याचा अंदाजच घेतला नसल्याने चौपदरीकरण झाले तरी शहरवासीयांना समस्यांना तोंड द्यावे लागण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या कामात प्रत्यक्ष पाहणी करून कामात सुधारणा करण्यास वाव असल्याचे मत आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी व्यक्त केले असून त्यासाठी अभ्यास करून ते ‘नही’कडे सोपविणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली खरी मात्र त्यात अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. त्यात शहरातील महामार्गाच्या कामांसंदर्भात तक्रारी वाढण्यासह भुयारी मार्गाचे काम सदोष असल्याचे आरोप होऊ लागले.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप लोकप्रतिनिधीच करीत आहे. त्यात प्रभात चौक येथे करण्यात आलेल्या अंडरपाससाठी तयार करण्यात आलेल्या स्लॅबची उंची ही अधिक असल्याने भविष्यात तेथे अपघाताची शक्यता असल्याचे आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी ‘नही’तर्फे करण्यात येणाºया कामात सुधारणा करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांनी काही बदलही सूचविले असून ते लवकरच ‘नही’ला देणार आहेत.
स्थळ पाहणी नसल्याने अडचणी
चौपदरीकरणाच्या या कामात शहरात प्रत्यक्ष पाहणी न करता थेट प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामांमध्ये सदोषपणा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शहराची गरज पाहून कोणत्या चौकात काय हवे, कोठे पूल हवा, कोठे भुयारी मार्ग हवा हे ठरविणे गरजेचे आहे. तसे झाले तरच महामार्ग चौपदरीकरणाचा लाभ शहरवासायींना होईल, अन्यथा भविष्यात हे चौपदरीकरण डोकेदुखी ठरू नये, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण १७ कि.मी रुंदीकरण झाल्यास चौपदरीकरणाचा फायदा
शहरातून जाणारा व त्यावर सतत वर्दळ असणाºया महामार्गाचे अंतर १७ किमी असताना केवळ आठ कि.मी.मध्येच काम सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण १७ कि.मी.वर हे काम होणे गरजेचे आहे. मध्ये केवळ आठ कि.मी. अंतरावर चौपदरीकरण झाले व त्यापुढे पुन्हा अरुंद रस्त्यामुळे आहे त्या समस्या कायमच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात वाढीव कामकरणेगरजेचेअसल्याचेस्पष्टमतशिरीषबर्वेयांनीव्यक्तकेले.
गिरणा पूल व रेल्वे पुलावर समस्या कायम
सध्या आठ कि.मी. अंतरावर होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये महामार्गाचे १५ मीटर रुंद रस्ता होणार आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील वर्दळ पाहता रस्ता हा २४ मीटर रुंद असावा, असे बर्वे यांचे म्हणणे आहे. मात्र तरीदेखील १५ मीटर रुंद रस्ता होत असताना बांभोरी जवळील गिरणा पूल व रेल्वे पुलावर हे अंतर ९ मीटरच राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याची व आता शहरवासीय ज्या समस्येला तोंड देत आहे, त्या अपघाताची शक्यताही कायम राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.