जिल्हाधिकारी मंजुळेंविरोधात उद्यापासून कार्यवाहीची प्रक्रिया; राज्य शासनाचे आदेश प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 05:15 PM2023-09-30T17:15:51+5:302023-09-30T17:16:34+5:30
नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून सेवेत असताना बालाजी मंजुळे यांनी कायद्यांसह प्रशासकीय संहिता तुडवत राज्य शासनाचे पावणे अकरा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कुंदन पाटील
जळगाव: नंदुरबारचे तत्कालिन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी कायद्याला तुडवत राज्य शासनाने १० कोटी ८२ लाख ६४ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी शासन आदेशानुसार सोमवारपासून कार्यवाहीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’ला दिली. नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून सेवेत असताना बालाजी मंजुळे यांनी कायद्यांसह प्रशासकीय संहिता तुडवत राज्य शासनाचे पावणे अकरा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार महसुल व वन विभागाने मंजुळे यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी विभागीय आयुक्त गणे यांना सक्षम अधिकारी म्हणून आदेश दिले आहेत.
यासंदर्भात गमे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. सुट्या असल्याने सोमवारपासून फौजदारी कार्यवाहीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. अहवालानुसार काही प्रकरणांची पडताळणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंध्रप्रदेशचे ‘केडर’ प्राप्त मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आलेल्या मंजुळे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारीसह आदिवासी संशोधन विभागातही सेवा बजावली आहे. मात्र त्यांच्या प्रतिनियुक्तीला राज्य शासनाने मुदतवाढ न दिल्याने त्यांना पुन्हा आंध्र प्रदेशात रुजू व्हावे लागले होते.
पहिलीच कारवाई
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई व्हावी, ही बाब खान्देशात पहिल्यांदाच होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच राज्यातही अशा स्वरुपाची कारवाईदेखिल ऐकिवात नसल्याचे सांगण्यात आले.