गृह विलगीकरणाची प्रक्रिया नातेवाईकांनी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:04+5:302021-03-21T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एखादा रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर गृहविलगीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी हा रुग्ण स्वत:च फिरतो व त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एखादा रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर गृहविलगीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी हा रुग्ण स्वत:च फिरतो व त्यामुळे संसर्ग अधिक वाढत असल्याचे समोर येत असल्याचे म्हणत आता रुग्णाला कोविड केअर सेंटरला ठेवून निगेटिव्ह नातेवाईकांनी ही प्रक्रिया करावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
गृह विलगीकरणाचा अर्ज आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळणार असून यासाठी कोविड केअर सेंटर ४ येथे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून या ठिकाणी १० ते ५ अर्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निकष तेच असून अर्ज दुसरीकडे कुठेच न मिळता कोविड केअर सेंटरलाच उपलब्ध होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, बाधितांनी स्वत: फिरू नये, होम आयसोलेशनची परवानगी मिळाल्यानंतर घरीच थांबावे, नियम पाळावे, असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
हे आहेत निकष
ज्येष्ठ नागरिक नसावेत, अन्य व्याधी नसाव्यात, बाधित व्यक्तीच्या घरात केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असावे, रुग्णाची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती घरी असावी, स्वतंत्र शौचालय व बाथरूमची व्यवस्था असावी, असे काही निकष होम आयासोलेशनसाठी आहेत.