प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 PM2021-01-23T16:29:38+5:302021-01-23T16:30:45+5:30
धरणगावात देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रचार व प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरासाठी निर्माण कार्य सुरू असून या मंदिरासाठी धरणगावात देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रचार व प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
ही शोभायात्रा बालाजी मंदिरापासून निघाली. यावेळी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन भाईदास बारेला, नुरीबाई बारेला, महेश अहिरराव, कविता अहिरराव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे गटनेते कैलास माळी, संतोष सोनवणे उपस्थित होते. या शोभायात्रेत रांगोळ्या, फुल त्याचबरोबर गावातील प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. याठिकाणी शोभायात्रेत रथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या प्रतिकृती धारण करून मुलांनी देखावादेखील सादर केला होता.
धरणगाव कल्याण आश्रमाच्यावतीने मुलींनी ध्वज नृत्य सादर केले. तसेच १००पेक्षा जास्त रामभक्त श्री पुरुष संस्कार केंद्राचे मुले-मुली सहभागी होते. या मिरवणुकीत ऐतिहासिक श्रीराम मंदिरासाठी निधी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत होते. हिशोब यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.
अखिल भारतीय सामाजिक समसरता गतिविधि कार्यकारणी सदस्य रमेश महाजन, मीरा महाजन यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाध्यक्ष एम. एच. चौधरी, तालुका कार्यवाह देवेंद्र उत्तरदे, निधी समर्पण अभियानाच्या तालुकाप्रमुख किरण वराडे, पंकज चव्हाण, देवेंद्र पाटील, शोभा चौधरी, जीवन पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी सिंगाने यांनी व आभार मंजूषा पाटील यांनी मानले.