निरूपयोगी कुकिंग ऑईलपासून बायो डिझेलची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 06:51 PM2019-05-11T18:51:23+5:302019-05-11T18:57:30+5:30
संशोधन : निर्मितीसाठी मायक्रोवेव्ह इरॅडिएशनचा वापर
जळगाव- कोळसा, नैसर्गिक वायू तसेच जीवाश्म इंधन मर्यादीत असल्यामुळे पर्यायी इंधनाच्या संशोधनावर सध्या सर्वत्र भर दिला जात आहे. यातच एसएसबीटी महाविद्यालयाच्या केमिकल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मायक्रोवेव्ह इरॅडिएशनचा वापर करून निरूपयोगी कुकिंग ऑईलपासून बायो डिझेलची निर्मिती केली आहे. हा संशोधन प्रकल्प मुयरी पाटील, काजल चव्हाण व जीवन चव्हाण या विद्यार्थ्यांनी बनविला आहे.
पेट्रोलियम सारख्या जीवाश्म स्त्रोतांद्वारे जगभरातील ऊर्जा आवश्यकतेची पूर्तता केली जाते. सध्या ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे़ वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे पर्यायी इंधन म्हणून बायो डिझेलची निर्मिती कशी करता येईल, यासाठी एसएसबीटीच्या मयुरी, काजल आणि जीवन या विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रकल्पातंर्गत मायक्रोव्हेवमधील उष्णता आणि इरॅडिएशन पद्धतीचा वापर करून निरूपयोगी कुकिंग आॅईलपासून बायो डिजेल तयार केले आहे. कमी खर्चात तसेच काहीवेळात बायो डिझेल निर्मिती या पध्दतीद्वारे केली जाऊ शकते, असा दावा त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
डिझेल इंजिनासाठी बायो डिझेल सर्वोत्तम पर्याय
डिझेल इंजिनांसाठी पयार्यी इंधनामुळे पर्यावरणीय बायो डीझेलच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेल इंजिनांसाठी बायोडीझेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. बायोडीझेलमधील सल्फरचे प्रमाण हे नगण्य असते, म्हणून पर्यावरणाची होणारी हानी कमी झाली आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या बायोडिझेलचा विविध मशिनरींधमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. या विद्यार्थ्यांना हा प्रकल्प तयार करण्यासाठी केमिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. वि. आर. डिवरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत सादर केला होता. त्यास पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी व संचालक मंडळाने कौतूक केले आहे.