विषमुक्त नैसर्गिक मिरचीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:10 PM2018-02-20T13:10:53+5:302018-02-20T13:14:27+5:30

मालावर प्रक्रिया करून स्वत:च करतात विक्री

Production of chilly | विषमुक्त नैसर्गिक मिरचीचे उत्पादन

विषमुक्त नैसर्गिक मिरचीचे उत्पादन

googlenewsNext
ठळक मुद्दे२० गुंठ्यात गावरान मिरची लागवडसमूह शेतीचा गट

आॅनलाईन लोकमत / राम जाधव
जळगाव, दि. २० - लासूर येथील शेतकरी मनेष पाटील यांनी नैसर्गिक शेतीपद्धतीचा अवलंब करून बहूपीक व सापळापीक पद्धतीतून अत्यल्प खर्चात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेंद्रिय उत्पादन काढण्याचे तंत्र विकसित व आत्मसात केले आहे़ एवढ्यावरच ते थांबले नाही, तर आपल्या मालाची आपणच मार्केटिंग व विक्री करण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे़ यासाठी ‘सोशल मीडिया’ या माध्यमांचा त्यांना चांगला उपयोग होत आहे़ यामुळेच त्यांना सध्या उत्पादन कमी जरी मिळत असले, तरी त्यातून त्यांना उत्पन्न मात्र चांगले मिळत आहे़
त्यांना यावर्षी दीड एकर शेतात आंतरपिकातून मूग २ क्विंटल आला़ त्याला ६० रुपये प्रतीकिलो तर त्याची दाळ करून थेट ग्राहकांना १२० किलोने त्यांनी विक्री केली. २५ क्विंटल तुरीचे उत्पन्न याच क्षेत्रातूनच अपेक्षित आहे.
शेताच्या चारही बांधावर शेतातीलच रामफळ, सीताफळ, चिंच या फळ वृक्षांच्या बिया टाकून नवीन झाडे वाढविली आहेत़ उर्वरित अडीच एकरपैकी दीड एकरावर कापूस लागवड मे महिन्यात केली़ त्यात मूग, उडीद ही आंतरपिके नायट्रोजन फिक्सिंग व सहजीवन म्हणून तीळ हे पीक जमिनीत स्फुरद साठवण्यासाठी आंतरपीक म्हणून टाकले. मूग, उडीद पावसामुळे खराब झाल्याने त्यांचे उत्पादन घटले़ तीळ ५० किलो आले तर कापूस १० क्विंटलपर्यंत आला. गुलाबी बोंडअळीमुळे यावर्षी कापसाचे उत्पादन बरेच घटले़
२० गुंठ्यात गावरान मिरची लागवड
जून महिन्यात गावरान मिरचीचे बियाणे रोप तयार करण्यासाठी टाकून दीड महिन्याचे रोप झाल्यावर अडीच बाय अडीच फुटावर पाऊस पडल्यावर चौफुली पाडून मिरची रोपाची मुळे फळसंजीवकात बुडवून लागवड केली़ लागवडीनंतर २० दिवसांनी घनजीवामृत व ताजे गांडूळ खत दिले. दोन वेळेस निंदणी करून तण नियंत्रण केले. साधारण सप्टेंबरमध्ये पाऊस बंद झाल्यानंतर सहजीवन म्हणून जमिनीत नायट्रोजन स्थिर होऊन उपलब्धतेसाठी व नैसर्गिक रित्या कीडनियंत्रणाच्या उद्देशाने मेथी आणि पोकळा फेकून कोळपणी करून मातीत कालवून पाणी दिले.
मिरचीवर घरीच तयार केलेले फळसंजीवक, गोमूत्र व ताक यांच्या आलटूपालटून फवारण्या करण्यात आल्या़
गिर कंकराज या देशी गाई व त्यांच्या पारड्या असे मिळून ९ गुरे असल्याने घरचेच ताक, गोमूत्र व शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
प्रत्येक पाण्यासोबत वेस्ट डिकंपोजर व फळसंजीवक हे जमिनीतून देण्यात आले. त्यामुळे रोगराई आली नाही व सतत बहार येत राहिले.
विषमुक्त भाजीपाला हवा असणाºया काही इच्छुक ग्राहकांना २ क्विंटल हिरवी मिरची मागणीप्रमाणे ६० रुपये किलोने गरजेनुसार तोडून विक्री केली़ दरवर्षीप्रमाणे लाल मिरची सुकवून पावडर तयार करून थेट ग्राहकांना २५० रुपये किलो या भावाने विक्री करणार आहे. तसेच पोकळा व मेथीचेही बियाणे तयार करणार आहेत़ आतापर्यंत अडीच क्विंटल लाल मिरचीची तोडणी करण्यात आली आहे. अजून ९ क्विंटल मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे.
सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड
२० गुंठ्यावर मिरची व २० गुंठ्यावर भेंडी, गवार, टोमॅटोची लागवड केली आहे़ गावरान मिरची, भाजीचे व भरिताच्या वांग्याची रोपे तयार केली. घरची लागवड करून उर्वरित रोपे १ रुपयाप्रमाणे विक्रीही केले़
भेंडी व रोपाच्या जागेवर रब्बीत कणक बन्सी गव्हाची पेरणी केली तर टोमॅटोच्या मंडपात दुधी भोपळ्याची लागवड केली़
मशागत न करता बायोमास जमिनीतच़़...
मशागतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी फळबागेच्या अडीच एकर क्षेत्राची मशागत पूर्णत: बंद केली आहे. तणे व पिकाचा बायोमास उपटून, कापून जागेवर आच्छादित केले जाते़ तर ठिबकमधून डिकंपोजर दिले जाते व वरून फवारणीही केली जाते. तसेच घनजीवामृत शेणखतावर डिकंपोजर टाकून तयार केलेले खत त्यावर टाकले जाते. त्यामुळे अनेक सजीव जीवाणू व गांडूळांमार्फत बायोमासचे जलद गतीने विघटन होत असून जमिनीत ह्युमस वृद्धी होत आहे़
मिरची पिकासाठी साधारणत: लागणारा खर्च
जमीन तयार करणे : २०००़
रोप लावणे, निंदणी फवारणी, कोळपणी मिरची तोडणी मजुरी : १२,०००़
पावडर व पॅकिंग : ३०००
एकूण खर्च : १८,०००
मिरचीचे एकरी निव्वळ उत्पन्न : ४४,०००़
यावर्षीचे मनेष पाटील यांच्या शेतीचे गणित़ सर्वसाधारणपणे ५ एकर क्षेत्रासाठी त्यांना सव्वा ते दीड लाखाचा खर्च जमीन तयार करणे, मशागत, मजुरी व काढणीसाठी लागला़
जास्त दराने विषमुक्त माल विविध शहरात
नैसर्गिक विषमुक्त उत्पादन म्हणून २० टक्के जास्तीचा दर इच्छुक ग्राहक देतात़ यापैकी कडधान्ये मूग व मिरचीवर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री करून व देशी व सुधारित बियाणे तयार करून संवर्धन विक्री करून निव्वळ उत्पन्न वाढवण्यावर दुप्पट करण्यावर भर आहे. विषमुक्त २ क्विंटल मुगाची दाळ करून थेट ग्राहकांना १२० रुपये किलोने ठाणे, मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर येथे ग्राहकांना पाठवली. मागील वर्षी गहू ५० रुपये किलो व भुईमूग शेंगा ७० रुपये किलोने जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मालेगाव येथे ग्राहकांना एस़ टी़ च्या पार्सल सेवेने पाठवले़ शेतीचे सर्व काम व्यवस्थापन मनेष पाटील स्वत:च सांभाळतात़ त्यांना या सर्व कामांत पत्नी व मुलेही शिक्षणसोबतच शेतीकामातही मदत करतात.
समूह शेतीचा गट
आत्मा अंतर्गत डी़ एस़ चौधरी व जगदीश पाटील, प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनात ‘फळ व भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया गट लासूर’ तसेच नैसर्गिक शेतीचा ‘बळीराजा नैसर्गिक शेती गट हातेड’ तयार केला असून रजिस्ट्रेशन सुरू आहे.

Web Title: Production of chilly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव