भडगाव नगरपालिकेची कचऱ्यातून उत्पन्न निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 05:39 PM2018-01-22T17:39:40+5:302018-01-22T17:45:20+5:30
भडगाव पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
भडगाव, दि. २२ : पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत भडगाव पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. येथील अग्निशामक दलाच्या प्रांगणावर सुका कचरा साठविण्या येत आहे. शहरात चार ठिकाणी ओला कचरा संकलन केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पालिकेत शहरातील बचत गटांना मुख्याधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करून कचरा व्यवस्थापन करण्यास आवाहन केले होते. त्यातून आता यात सहभागी झालेल्या चार बचत गटांना कायम रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे.
शहरातील स्वच्छता कायम राहण्यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. त्यात विविध माध्यमातून प्रचार केला जात आहे. शहरात बसस्थानक, व्यापारी संकुले आदी ठिकाणांसह १५ नव्या कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत.
ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ओला कचरा एका मोठ्या तयार केलेल्या कुंड्यात साठवला जात आहे, तर मागील महिन्याभरात सुक्या कचऱ्यातून पुठ्ठा ५०२ किलो (४०१६ रुपये), प्लॅस्टिक ५९२ किलो (५९२० रुपये), गोणपाट १२८ किलो (३८४ रुपये), काच १७१ किलो (३४२ रुपये), पत्रा १८३ किलो (२१९६ रुपये), रद्दी ६०० किलो (३००० रुपये) असा एक महिन्यात २१७६ किलो वजनाचे १५ हजार ८९८ रुपये उत्पन्न मिळाले.