प्रो.मार्क लिंडले यांची मैफल : म्युङिाक फॉर पिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:53 PM2017-11-17T23:53:39+5:302017-11-17T23:57:59+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये दिनेश दीक्षित यांनी संगीत क्षेत्रातील अमेरिकेतील प्रो. मार्क लिंडले यांच्या संगीत मैफिलीचा घेतलेला आढावा.

Prof. Mark Lindley's concert: Music for Peace | प्रो.मार्क लिंडले यांची मैफल : म्युङिाक फॉर पिस

प्रो.मार्क लिंडले यांची मैफल : म्युङिाक फॉर पिस

Next

संगीताच्या सुरांना कशाचंही बंधन नसतं. हे सुर थेट काळजाला हात घालतात. खास करून तेव्हा, जेव्हा या संगीताला अभिजाततेचा दर्जा आणि शांततेचं कोंदण लाभलेलं असतं. गेल्या शनिवारी अशीच एक आगळी अन् दजेर्दार संगीत मैफल जळगावातील भाऊंच्या उद्यानात रंगली. अमेरिकेतील प्रो. मार्क लिंडले यांनी सिंथेसायझरमधून अशी काही सुरावट रंगवली की ऐकणारे तृप्त अन् तल्लीन झाले. संगीताच्या या आगळ्या सुरावटीत रसिक चिंब चिंब झाले. संगीत क्षेत्रात भारताचे स्थान अढळच. आपल्याकडच्या संगीताला प्राचीन परंपरा आहे, तशी संगीताच्या खांद्यावर सप्तसुरांची मोहोरदेखील आहे. अन्य संगीतामध्ये सप्तसुर तसे आढळत नाहीत. इतर ठिकाणी केवळ दोन प्रकारचे सुर आढळतात वरचा आणि खालचा. प्रो. मार्क लिंडले यांनी दोन सुरांची साथ घेत रसिकांच्या काळजालाच हात घातला, हीच खरी संगीताची जादू. वरचा आणि खालचा सुर सिंथेसायझरवर लिंडले यांनी असा काही छेडला की ऐकणारे देहभान विसरले. संगीतावर गाढ श्रद्धा असलेले प्रा. मार्क लिंडले यांचा गांधीतत्त्वाचा दांडगा अभ्यास. गांधीजींच्या संदर्भातील विषय त्यांनी कोळून प्यायले असेच म्हणा ना. गेली तीन दशके गांधी अध्ययन व अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनपर लेखनाने शिक्षण क्षेत्राला नवे वळण दिले आहे. जळगाव येथे गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये ते संशोधनासाठी नियमितपणे येत असतात. गांधीजींच्या जीवनाशी संबंधित त्यांनी संशोधनपर लेखनही केलेले आहे. प्रो. मार्क लिंडले जसे गांधी विचार जोपासून आहेत, तसे ते संगीताच्या क्षेत्रातही रमलेत. त्यामुळेच त्यांनी जर्मनीतील प्रसिद्ध संगीततज्ज्ञ जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या की-बोर्डवरील रचनांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. 19व्या शतकातील प्रतिभाशाली संगीतकार म्हणून गणल्या गेलेल्या जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी ऐकल्या आणि ते त्याच्या प्रेमातच पडले. या मैफलीत प्रो. लिंडले यांनी करूणा, शांती आणि आनंदाच्या तरंगात रसिकांना नेऊन सोडले. सिंथेसायझरवर त्यांची चालणारी बोटं आणि त्याच्या भोवती त्यांनी धरलेला नादमय ठेका हे सारे त्यांची तल्लीनता अधोरेखित करत होती. या मैफलीत त्यांनी बाख यांच्या 10 रचना सादर केल्या. येशुला क्रुसावर चढवत असताना हृदयाला जाणवणारी वेदना त्यांनी सिंथेसायझरमधून प्रकट केली, ती उपस्थित रसिकांच्या अंतर्मनाला जावून भिडली. खालच्या आणि वरच्या सुरावटींच्या लहरींवर जळगावकरांच्या अंतरंगात नादमाधुर्याची निर्मितीच जणू झाली. सुरावटींचा पिस संपल्यानंतर भरभरून दाद जळगावकरांनी दिली ही त्याचीच पावती म्हणावी. जर्मनीतल्या संगीतकार बाखची रचना अमेरिकेतले लिंडले जळगावात सादर करतात आणि रसिक त्यात रंगून जातात, ही जादू, ही किमया संगीताच्या सुरांमध्येच आहे. संगीताला सीमेचे बंधन नसते हे खरे. संगीत आणि शांती यांचा जवळचा संबंध प्रो. लिंडले यांनी तो अधोरेखित केला. धर्म वेगळा, प्रांत वेगळा, सादरकरणही निराळंच तरी ते स्वीकारलं गेलं. नुसतंच स्वीकारलं नाही तर ते भावलं आणि हृदयातही जाऊन बसलं. हेच आहे म्युङिाक फॉर पिस.

Web Title: Prof. Mark Lindley's concert: Music for Peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.