प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास
By विलास बारी | Published: February 4, 2024 05:54 PM2024-02-04T17:54:36+5:302024-02-04T17:54:47+5:30
अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे.
अमळनेर (जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणत आहात म्हणत तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे थोडावेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. हा प्रकार घडल्यानंतर निमंत्रक रणजित शिंदे यांनी प्रा. शोभणे यांना गोड घास भरवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शोभणे हे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. यावेळी राज्य विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निमत्रंक रणजित शिंदे यांनी शोभणे यांना चुरमा भरवून तोंड गोड करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना शोभणे म्हणाले की, जसा गोड पदार्थ खाऊ घातला तशी मनेही गोड करा. मात्र तरीही हा अनुभव वाईट होता. चला, चला म्हणजे काय आम्ही अस्पृश्य आहोत का? असा सवालही त्यांनी केला. यानंतर प्रा. शोभणे तिथून निघून गेले. अ.भा.म.सा. मंडळाचे सदस्य मिलिंद जोशी व नरेंद्र निकम हेही त्यांच्यासमवेत होते.
मुलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची उराउरी भेट घेतली. मात्र त्यापूर्वीच चला-चला असे काहीजण म्हणाले. सर्वच आमचे आहेत म्हणून आलो होतो. पण हा प्रकार वाईट आहे. आम्ही स्वागतशील आहोत, त्यांनीही असावे. मुलाटे कार्यक्रमात व्यस्त असल्याने जाताना भेटायला आले नाही. ते का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझे लेखनही ग्रामीण, प्रादेशिक आणि विद्रोही स्वरूपाचेच आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. मतभेदाचे संवादात रूपांतर व्हावे आणि या संवादातून सुसंवाद घडावा. - डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन.
आपण शोभणे यांचे स्वागत केले. मी संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी त्यांना निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी जर म्हणत असेल घरापर्यंत सोडा तर ते कसे काय शक्य आहे. -डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.
पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणला. तुमच्या व्यवस्थेने आम्हाला नाकारलं आहे. महामानव महात्मा फुलेंनी सांगितले आहे, की आमचा विचार आम्ही करू. त्यानंतर आमचे लोक एकीचे बीज शोधून काढतील. त्या फुलेंच्या पत्रावर आधारित हे साहित्य संमेलन आहे. तुुमचं कशासाठी स्वागत करायचं, कोण तुम्ही. ही गोष्ट आम्ही शांततेने विचारत आहोत. - कॉ. किशोर ढमाले, राज्य संघटक, विद्रोही साहित्य चळवळ.