प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 09:33 PM2021-03-08T21:33:53+5:302021-03-08T21:33:53+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा. ई. वायुनंदन यांनी मावळते कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील ...

Prof. Vayunandan accepted the post of Vice Chancellor in charge | प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार

प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा. ई. वायुनंदन यांनी मावळते कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्याकडून सोमवारी सकाळी स्वीकारला. आपण मितभाषी असून, बोलण्यापेक्षा कामावर अधिक विश्वास आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र व सोबत घेऊन या विद्यापीठाच्या विकासासाठी बांधिल असल्याची ग्वाही प्रा. वायुनंदन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे कुलपती तथा राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली. सोमवारी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला.

मी मुळात शिक्षक असून, नंतर कुलगुरु आहे...
कुलगुरूंच्या दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बोलताना प्रा.वायुनंदन म्हणाले की, चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाइन परीक्षा शंभर टक्के यशस्वी करून दाखविल्या. आपण मितभाषी असूनल बोलण्यापेक्षा कामावर अधिक विश्वास आहे. या विद्यापीठाने तंत्रज्ञानात प्रगती केलेली असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल. मी मुळात शिक्षक असून, नंतर कुलगुरू आहे, असेही ते म्हणाले.

अडचणींवर मात करत सर्वांसोबत काम केले...
प्रा.पी.पी. पाटील म्हणाले की, १९९१ साली या विद्यापीठात शिक्षक म्हणून रूजू झालो तेव्हा आयटीआयच्या वसतिगृहात हे विद्यापीठ सुरू झाले होते. तेव्हापासून अनेक अडचणींवर मात करत २०१६ मध्ये कुलगुरूपदावर काम करण्याची संधी मिळाली. सव्वाचार वर्षांत सर्वांना सोबत घेऊन काम केले. सर्व प्राधिकरणे, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, प्राचार्य, संस्थाचालक या सर्वांनी माझ्यावर प्रेम केले, सोबत राहिले याबद्दल प्रा. पाटील यांनी ऋृण व्यक्त केले. प्रकृती साथ देत नसल्यामुळे आपण या पदाचा राजीनाम दिला असेही ते म्हणाले.

स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार
प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते प्रा. पी. पी. पाटील व प्रा. वायुनंदन यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकर यांचा कार्यकाळदेखील प्रा.पी.पी.पाटील यांच्या सोबत संपुष्टात आल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या हस्ते प्रा. माहुलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी. फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक बंडू पाटील, प्रा.जितेंद्र नाईक, डॉ. प्रीती अग्रवाल, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रा. संजय शेखावत, प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी, एस.आर. गोहील आदी उपस्थित होते.

व्यवस्थापन परिषद सदस्यांशी चर्चा
पदभार स्वीकारल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांची बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीत व्य.प. सदस्य दिलीप पाटील यांनी कुलगुरू प्रा. वायुनंदन व प्रा.पी.पी.पाटील यांचे स्वागत केले. प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेत विद्यापीठाच्या विकासासाठी प्राधिकरण सदस्य कुलगुरूंच्या सोबत कायम राहतील, अशी ग्वाही दिली.

 

 

Web Title: Prof. Vayunandan accepted the post of Vice Chancellor in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.