आजारपणाला कंटाळून जळगावात प्राध्यापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:04 PM2019-12-05T22:04:02+5:302019-12-05T22:04:17+5:30
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह प्राध्यापकांची गर्दी
जळगाव : परदेशात वास्तव्यास असलेली मुलगी व मुंबई येथे शिकत असलेला भावी संशोधक मुलगा या दोघांना घरी बोलावून घेतले, त्यानंतर त्याची शेवटची भेट घेवून नूतन मराठा विद्यालयाचे प्रा. किशोर यादवराव देशमुख ( ५८, रा. शिवकॉलनी) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. प्रा. देशमुख यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत शारिरीक व्याधींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे़
शिवकॉलनी येथे गट नं. ५५ , प्लॉट नं़ ४० याठिकाणी प्रा. किशोर देशमुख हे पत्नी कुमूदिनी यांच्यासह वास्तव्यास होते. देशमुख यांना मुलगा व मुलगी आहे. मुलगा कुणाल हा मुंबई येथे इंडियन क्लिनीकल रिसर्च येथे शिक्षण घेत आहे. तर मुलगी केतकी हिचा विवाह झाला असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी प्रा.देशमुख यांनी मुलगा कुणाल व मुलगी केतकी हिला जळगावात घरी बोलावून घेतले. त्यामुळे एक ते दोन दिवसांपासून मुलगा व मुलगी घरी आले होते़
प्रा. देशमुख यांच्या पार्थिवावर नायगाव ता. यावल येथे शुक्रवार ६ रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गुरूवारी सकाळी पत्नी वरच्या घरात पती प्रा.देशमुख यांना उठविण्यास गेली असता, त्यांनी साडीने गळफास घेतल्याचे ते आढळून आले. आरडाओरड केल्यानंतर मुलगा, मुलगी तसेच शेजारचे नागरिक धावून आले. व त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.
प्रा. देशमुख हे नायगाव (ता. यावल) येथील मूळ रहिवासी आहेत. भाऊ मनोज व आई हे गावाकडे राहतात. देशमुख हे सन १९८७ पासून नूतन मराठा विद्यालयात प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रॉनिक विभागात कार्यरत होते. जुलै २०२० मध्ये सेवानिवृत्त होणार होते, अशी माहिती प्राध्यापक सहकाऱ्यांनी दिली. अत्यंत शांत स्वभावाचे तसेच कमी बोलणारे प्राध्यापक म्हणून देशमुख महाविद्यालयात परिचित होते. बुधवारी त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकांसमवेत जेवणही केले. किमान कौशल्य समिती तपासणीसाठी येणार असल्याचे त्यासाठी तयारी सुरु होती, या तयारीत प्रा.देशमुखही सहभागी होते. मात्र सकाळी अचानक आत्महत्येच्या घटनेने प्राध्यापकांनी सुन्न झाले होते. सर्व सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले होते.
प्रामाणिक आणि हाडाचा शिक्षकाचे अचानक जाण्याने आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी कधीच कुणाबद्दल तक्रार केली नाही आणि त्यांच्याबद्दलही कुणाचीही तक्रार नव्हती. अशी माणसं फार कमी असतात. -प्राचार्य एल.पी.देशमुख, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव.