कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा दीडपटीने रुग्णवाढीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:23 AM2021-09-10T04:23:58+5:302021-09-10T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुसऱ्या लाटेतील ॲक्टिव्ह केसेसच्या दीडपटीने रुग्ण वाढू शकतात, असा अंदाज वर्तवून त्या दृष्टीने नियोजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेतील ॲक्टिव्ह केसेसच्या दीडपटीने रुग्ण वाढू शकतात, असा अंदाज वर्तवून त्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासनाला गुरुवारी पत्र दिले आहे. आधीही असे पत्र आले होते. त्याबाबतचे गुरुवारी स्मरणपत्र आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, रुग्ण वाढले तरी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांपर्यंत गेली होती. त्या दृष्टीने २२ ते २३ हजार रुग्ण तिसऱ्या लाटेत समोर येऊ शकतात, असा हा अंदाज वर्तवून त्याबाबतच्या सूचना काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. त्याबाबतचे दुसरे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहे.
मोहाडीत ६५० बेड
मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइन अंतर्गतच ६५० बेड तयार होत आहेत. शिवाय, अन्य ठिकाणचे नियोजन असे साडेपाच हजारांवर ऑक्सिजन बेड उपलब्ध राहणार आहेत. त्यातच ऑक्सिजन प्रकल्पांचे ८० ते ९० टक्के काम झाले असून ट्रान्सफाॅर्मरचा प्रश्न सुटल्यानंतर ते कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तरी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एकत्रित परिस्थिती व वातावरण बघता यापुढे कधीही तिसरी लाट येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.