स्वच्छतेच्या क्रमवारीत जळगाव शहराची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:00 PM2019-03-07T12:00:53+5:302019-03-07T12:00:59+5:30

राज्यात २१ वा क्रमांक

Progress of Jalgaon City in Cleanliness Ranking | स्वच्छतेच्या क्रमवारीत जळगाव शहराची प्रगती

स्वच्छतेच्या क्रमवारीत जळगाव शहराची प्रगती

googlenewsNext
ठळक मुद्दे ८४ वरून ७६ वे स्थान मिळविले; वर्षभरातच मारली मुसंडी



जळगाव : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत जळगाव शहराने स्वच्छतेच्या बाबतीत देशभरात ७६ वा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराचा ८४ क्रमांक होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत शहराच्या स्वच्छतेच्या दर्ज्यात वाढ झाली आहे.
केंद्र शासनाकडून ४ ते ३१ जानेवारीदरम्यान ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ही स्पर्धा संपुर्ण देशभरात राबविण्यात आली. ही स्पर्धा एकुण ५ हजार गुणांसाठी घेण्यात आली. यामध्ये १२५० गुण शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा अहवाल, १२५० गुण शहरातील हगाणदरीची स्थिती, १२५० गुण नागरिकांकडून आलेला अहवाल तर १२५० गुण हे प्रत्यक्ष पाहणीसाठी ठेवण्यात आले होते. जळगाव शहराला ५ हजार गुणांपैकी ३ हजार ३१ गुण प्राप्त झाले.
या वर्षी देशभरातून पाच हजार शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तर गेल्या वर्षी साडे चार हजार शहरे सहभागी झाले होते. त्यात जळगाव शहराचा ८४ वा क्रमांक होता. यंदा मात्र यात प्रगती झाली आहे. त्यात ७६ वा क्रमांक मिळविला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही हे यश मिळाले.
कचरा प्रक्रिया नसल्याने ५०० गुणांचा फटका
शहराने यंदा स्वच्छतेच्या दर्जा वाढवला असून, यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील व स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक महेंद्र पवार यांनी उल्लेखनीय काम केले. विशेष करून या अभियानादरम्यान शहरातील भिंतीवर पेंटींग्सव्दारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे शहराच्या गुणांमध्ये चांगलीच वाढ झालेली असल्याचेच लक्षात येत आहे.
मात्र, जळगाव मनपाचा घनकचरा प्रकल्प बंद असल्याने शहरातील कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे शहराचे ५०० गुणांचे नुकसान झाले आहे. तसेच शहराचे ओडीएफ प्लसचे सर्वेक्षण झाले नसल्याचाही फटका या रॅकींगमध्ये बसला आहे.
कचरा प्रक्रिया सुरु राहिली असती तर शहराचे रॅकींग ५० च्या आत राहिले असते.
प्रत्यक्ष पाहणीत शहराला मिळाले सर्वाधिक गुण

शहराचे मुल्यांकन हे दैनंदिन स्वच्छतेचा अहवाल, हगणदारीची स्थिती, नागरिकांकडून आलेला अहवाल व प्रत्यक्ष पाहणी या चार निकषांवर हे सर्वेक्षण पार पडले. यामध्ये जळगाव शहराला ५ हजार पैकी ३०३१ गुण मिळाले असून, सर्वाधिक गुण हे प्रत्यक्ष पाहणीत मिळाले आहेत.

Web Title: Progress of Jalgaon City in Cleanliness Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.