जळगाव जिल्ह्यात औषधी विक्रेत्यांचा बंद, जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:25 PM2018-09-28T12:25:39+5:302018-09-28T12:26:00+5:30
जळगाव शहरात सोयीसाठी १२ दुकाने सुरु
जळगाव : आॅनलाईन फार्मसी विरोधात औषधी विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदला रात्री १२ वाजेपासून सुरुवात झाली असून २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील ५०० तर जिल्ह्यातील २५०० औषधी विक्रेते सहभागी झाले आहेत. या दरम्यान जळगाव शहरात २८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये शहरातील १२ औषधांची दुकाने सुरू आहे.
ई फार्मसी विरोधात १ दिवसीय जिल्हास्तरीय बंदची हाक औषध विक्रेत्यांनी दिली आहे. यामध्ये जळगाव शहरातील ५०० तर जिल्ह्यातील २५०० औषधी विक्रेते सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.
दरम्यान, ‘एफडीए’ने ‘आयएमए’ला औषधी तसेच लसींचा साठा करून ठेवण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार डॉक्टरांना साठ्याबाबत सूचना दिल्या असल्याचे ‘आयएमए’चे सचिव डॉ.विलास भोळे यांनी सांगितले.
जेनेरिक मेडिकल्स खुले
या बंदच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुरस्कृत शहरातील सर्व जेनेरीक मेडीकल्स सुरू आहेत.