गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांना दमडीही नाही - पालकमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:15 PM2020-01-12T12:15:59+5:302020-01-12T12:20:09+5:30
शिवसेनेचे आमदार शेजारील मतदार संघ दत्तक घेणार
जळगाव : जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या कामांना ब्रेक लागण्यासह बलून बंधारे असो की पाटचाºया, यांचा प्रश्न बिकट असून गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील प्रकल्पांना दमडीही मिळालेली नाही, असा दावा पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. दरम्यान, जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यासह जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा डीपीआर तयार असल्याचा दावा तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या आताच्या दाव्यामुळे नेमका निधी मंजूर झाला की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्री पद स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटना तसेच त्यांच्या मतदार संघात असलेल्या विविध प्रश्नांविषयी माहिती घेण्यासाठी शनिवारी दुपारी बैठक घेतली. त्या वेळी आमदारांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या विविध प्रश्नांची माहिती मंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील यांनी या विषयी माहिती दिली.
पाटचाºयांमध्ये पाणी नाही
जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पांतर्गत होणाºया पाडळसरे धरणाच्या कामाला ब्रेक लागला असून बलून बंधाºयांचेही कामे रखडले आहेत. तसेच पाटचाºयांची बिकट स्थिती असल्याने त्याचा लाभ होत नाही. असे असले तरी गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील प्रकल्पांना एक दमडीही मिळालेली नाही, असा दावा गुलाबराव पाटील यांनी या वेळी केला. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
निधी गेला कुणीकडे?
भागपूर उपसा सिंचन योजनेस नाबार्ड अंतर्गत मंजूर झालेल्या १५ हजार कोटीच्या अर्थसहाय्यातून येत्या तीन वर्षासाठी २ हजार कोटी निधीची तर निम्न तापी (पाडळसरे) मोठा प्रकल्प ता. अमळनेर प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पास एक हजार कोटी निधीची तरतूद मंजूर करण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी ११ सप्टेंबर २०१९ रोजी सांगितले होते. तसेच बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेस ५०० कोटी, वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पास (ता.चाळीसगाव) १६२.८६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचीही माहिती महाजन यांनी दिली होती. एवढा निधी दिल्याचा दावा व आता पाच वर्षात दमडीही मिळालेली नाही असा दावा पालकमंत्री करीत असतील तर निधी गेला कोठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सर्वच तालुक्यातील प्रश्न सोडविणार
जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार असून त्यांच्यावतीने त्या-त्या तालुक्यात पक्ष संघटन वाढीच्या कामासह जनतेचेही प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जाणार असून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हे कामे करायचे आहे. त्यामुळे शिवसेनेचे पाचही आमदार त्यांच्या शेजारील मतदार संघ दत्तक घेणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. येत्या १६ ते १७ महिन्यात जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुका असल्याने पक्ष बांधणीसाठीही बैठकीत मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
‘जलयुक्त’च्या ८०० कोटींच्या कामांवरील स्टे उठविला
जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात येणाºया कामांचा निधी रोखण्यासंदर्भात पालकमंत्री म्हणाले की, निधी रोखलेला नाही, केवळ त्यावर स्टे होता. त्यापैकी ८०० कोटींच्या कामावरील स्टे उठविला असून या विषयी आपण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याच्या संदर्भातील विषयांची अडवणूक केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
२० जानेवारी डीपीडीसीची बैठक
जिल्ह्याचा २०२०-२०२१चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक २० जानेवारी होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले. नाशिक विभागाची बैठक २४ रोजी होणार असून तत्पूर्वी जिल्हा समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने त्या विषयी नियोजन करण्यात आले आहे.
मारामारी, शाईफेक हा भाजपचा अतंर्गत विषय
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झालेल्या मारहाण व शाई फेकीच्या प्रकाराबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी काहीही करावे. भाजप व मनसे युतीच्या मुद्यांवरही त्यांनी हा दोन्ही पक्षांचा विषय असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. जिल्ह्यात गुन्हे होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक त्यांची, कारखाना त्यांचा.....
जिल्हा बँकेतील सत्तेचा दुरूपयोग करीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई कारखान्याला जादा कर्ज दिल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत या कारखान्यास मागणी केलेल्या ८१ कोटी ९६ लाखांपैकी ५५ कोटींचे कर्ज देण्यास मंजुरी देण्यात आल्याच्या मुद्यावर ‘बँक त्यांची, कारखाना त्यांचा’, नियमित कर्जफेड केल्याने कर्ज मंजूर केले असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली सदिच्छा भेट
माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी अजिंठा विश्रामगृह येथे गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.